Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रुपया (का) पडतोय..? म्हणून खिशात अधिक पैसे ठेवा!

rupee-why-falling-so-keep-more-money-in-your-pocket

रुपया (rupee) पडतो म्हणजे नेमकं काय होतं. त्याचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम होतो. सातत्याने घसरण होणा-या रुपयामुळे आपल्याला खिशात-वॉलेटमध्ये (wallet) अधिक पैसे का ठेवावे लागू शकतात. भडकणाऱ्या महागाईशी (inflation), देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा काही संबंध आहे का?

रुपया सतत पडतोय. त्यानं तळ-नीचांक गाठलाय. अशी वाक्य आपण गेल्या अनेक दिवसांपासून एकतोय. रुपया घसरतोय तर त्याचं आपल्याला काय? सरकार बघून घेईल, असंही तुम्हाला वाटू शकतं. पण या ढासळत्या रुपयाचा आपल्या उत्पन्न आणि खर्चावर विपरित परिणाम होतो. एवढंच नव्हे तर आधीच वाढलेल्या महागाईत ते इंधन घालण्याचंही काम करतंय, कसं ते पाहू या.

रुपया नेमका कसा पडतो? 

डॉलरच्या (dollar) तुलनेत रुपयाचं मूल्य दिवसेंदिवस घसरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला एका डॉलरसाठी 74 रुपये मोजावे लागत असताना आता थेट 80 रुपये एका डॉलरसाठी खर्ची करावे लागत आहेत. गेल्या आठवड्यापासून विदेशी चलन विनिमय मंचावर (foreign currency exchange) डॉलरच्या तुलनेत रुपया 79च्या खाली व्यवहार करत आहे. सलग तीन सत्रात तर त्याने 80 पर्यंतची गटांगळीही अनुभवली.

1 dollar price cost in rupees

रुपयाची तुलना कोणाशी

अर्थातच रुपयाची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावर तरी अमेरिकन डॉलरशीच होते. म्हणजेच एक अमेरिकी डॉलरबरोबर काही रुपये. तर एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला मोजावी लागणारी किंमत म्हणजेच भारतीय चलनाचं मूल्य आणि ते सध्या 80 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. जानेवारी 2022 मध्ये ते 74 रुपये होतं.

स्थानिक रुपयाबरोबरच अनेक देशांच्या स्थानिक चलनातही गेल्या काही सत्रांपासून घसरण सुरू आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत युरोपच्या युरोची तर आता अमेरिकी डॉलरने बरोबरी साधली आहे. म्हणजे अमेरिकी चलनाला मोजावे लागणाऱ्या रुपयांपैकी अधिक रक्कम यापूर्वी युरोसाठी (Euro) मोजावी लागायची. आता दोन्ही विदेशी चलनाला सारखंच मूल्य प्राप्त झालंय.

महागाई वाढणार

भारताला आंतरराष्ट्रीय व्यवहार हे डॉलरमध्ये करावे लागतात. आयात कराव्या लागणाऱ्या या अनेक वस्तूंसाठी परिणामी डॉलरमध्ये खरेदी करावी लागते. भारतातून कापड, खाद्यपदार्थ, मसाले, चहा आदी मोठ्या प्रमाणात निर्यात होत असले तरी देशात आयात होणाऱ्या वस्तूंची यादी मोठी आहे. खनिज तेल, सोनं-चांदी यांच्या आयातीचा भार सरकारच्या तिजोरीवर पडतोच. शिवाय स्टील, सिमेंट, वाहन आणि विद्युत उपकरणांशी संबंधित अनेक वस्तुंसाठी आपल्याला आयातीवर (import) अवलंबून राहावं लागतं. त्याचबरोबर महागड्या अशा डॉलरमुळे विदेश प्रवास आणि शिक्षणही आवाक्याबाहेर जातं. याउलट भारतातील औषधनिर्मिती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना वधारत्या डॉलरचा लाभ पदरात पाडून घेता येणं शक्य आहे.

डॉलरच्या तुलनेत 80 पारचा प्रवास करणाऱ्या रुपयानंतर नुकत्याच लागू केलेल्या वाढीव जीएसटी कराची जोड वाढत्या महागाईला मिळाली आहे. अनेक वस्तू तसेच सेवांवरील दर त्यांच्या आधीच्या टप्प्यापासून एक ते दोन पायऱ्यांनी उंचावण्यात आले आहेत.

डॉलरचा भाव का वधारला

आता हे नेमकं सारं का घडतंय ते पाहुयात. तर अर्थातच भक्कम डॉलरमुळे. पण डॉलरचा भाव अचानक का वधारला असावा. भारतीय भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदार (foreign institutional investors) मोठ्या संख्यने आणि मुल्याने व्यवहार करतात. मात्र, 2021च्या अखेरपासून ते येथील शेअर मार्केटमधील (stock market) समभाग विकून पैसे काढून घेत आहेत. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात अमेरिकी चलनाची आवश्यकता भासत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच त्यांनी 30 अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.

तसंच आधी म्हटल्याप्रमाणे, भारताचं निर्यातीच्या (export) तुलनेत आयातीचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी सरकार, व्यापाऱ्यांकडूनही डॉलरसाठीची अधिकची मागणी राहली आहे. परिणामी आयात–निर्यातीतील व्यापारी तूटही (trade deficit) वाढू लागली आहे. त्याचबरोबर देशातील विदेशी चलनातील गंगाजळी (forex reserve) सातत्याने रोडावत आहे. त्याचा विपरित परिणाम येणाऱ्या कालावधीत देशाच्या पतमानांकनावर (rating) आणि कर्ज (debt) मागणी - उभारणीवर होऊ शकतो.