शेअर मार्केटमधील घसरण आणि डॉलरची मागणी वाढल्याने चलन बाजारात रुपयाला फटका बसला आहे. आज मंगळवारी 6 डिसेंबर 2022 रोजी डॉलरसमोर रुपयाने 82.60 ची पातळी गाठली. मागील एक महिन्यातील रुपयाची ही नीचांकी पातळी आहे.सलग दुसऱ्या सत्रात रुपयाचे मूल्य घसरले आहे. रुपयाने आज पुन्हा 82 ची पातळी गाठल्याने सरकारसाठी मात्र डोकेदुखी वाढली आहे. तूट नियंत्रणासाठी सरकारला काटकसर करावी लागणार आहे.
चलन बाजारात आज रुपया 81.9150 वर खुला झाला. मात्र डॉलरच्या मागणीमुळे रुपयाची दमछाक झाली.रुपया डॉलरसमोर 80 पैशांनी घसरला आणि तो 82.60 पर्यंत खाली आला. 50 दिवसांचा रुपयाची सरासरी पातळी 81.98 होती मात्र आज तो त्याखाली घसरला. मागील दोन सत्रात रुपयाचे डॉलरसह इतर सर्वच प्रमुख चलनांसमोर अवमूल्यन झाले आहे. ज्यामुळे परकी कर्ज घेतलेल्या कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात डॉलरसमोर रुपयाने चांगली कामगिरी केली होती. तो 1.6% ने वधारला होता.
रुपयामध्ये सोमवारी देखील घसरण झाली होती. तो डॉलरसमोर 0.5% घसरला आणि तो 81.75 पर्यंत खाली आला होता. डॉलर समोर रुपयाचे अवमूल्यन झाले तर चीनच्या युआनमध्ये तेजी दिसून आली. मागील तीन सत्रात डॉलरसमोर रुपयात 150 पैशांचे अवमूल्यन झाले आहे. रुपयाने 82 ची धोकादायक पातळी ओलांडल्याने रिझर्व्ह बँकेला आता चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागेल.
तिजोरीवर भार वाढणार, तूट नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान
रुपयाच्या मूल्य घसरणीने भारताची वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे.कच्च्या तेलाच्या महागाईने आयात बिलात मोठी वाढ झाली आहे.त्यात आता रुपयाचे मूल्य कमकुवत झाल्याने आयातीचा खर्च आणखी वाढणार आहे.केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी वित्तीय तूट ही'जीडीपी'च्या तुलनेत 6.4% पर्यंत नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूला आयातदार कंपन्यांना जादा पैसे मोजावे लागतील. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे की एलईडी टीव्ही, टीव्ही पॅनेल, कॉम्प्युटर चिप्स, वाहनांचा सुटे भाग, एसी, फ्रिज अशा वस्तूंची आयातीसाठी कंपन्यांना जादा खर्च करावा लागेल.यामुळे कंपन्याकडून भाववाढ केली जाईल.