RuPay card Payment: ऑनलाइन शॉपिंग करताना किंवा कोणतेही बिल पेमेंट करताना सर्सास क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र, प्रत्येक वेळी कार्डचा क्रमांक, एक्सपायरी डेट आणि मागील बाजूला असलेला तीन अंकी CVV कोड अचूक टाकावा लागतो. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट ही एक कसरतच असते.
आता रुपे क्रेडिट, डेबिट कार्डधारकांना CVV क्रमांक टाकण्याची आवश्यकता नाही. (RuPay card payment without CVV) त्यामुळे आता ऑनलाइन पेमेंट अधिक सुलभ झाले आहे. मात्र, हे कार्ड टोकनाइज केलेले असावे. ऑनलाइन शॉपिंगसाइटवर कार्ड टोकनाइज करता येते.
कार्ड टोकनाइजेशन म्हणजे काय?
रुपे कार्डवरील ही सुविधा अशा डेबिट, क्रेडिट कार्डसाठी उपलब्ध आहे, जी टोकनाइज ( Card Tokenization) केलेली आहेत. मागील वर्षी आरबीआयने कार्ड टोकनाइजेशनचा नियम लागू केला आहे. त्यानुसार कोणत्याही ऑनलाइन मर्चंट्स म्हणजेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना ग्राहकांच्या कार्डची संवेदनशील माहिती वेबसाइटवर साठवून ठेवता येणार नाही. त्याऐवजी ग्राहकाच्या कार्डची माहिती टोकन स्वरुपात साठवता येईल, असा हा नियम आहे. फक्त टोकनाइज रुपे कार्डद्वारे ग्राहकांना CVV क्रमांकाशिवाय पेमेंट करता येणार आहे.
तुम्ही कार्ड टोकनाइज केले आहे का? (How to tokenize Card)
ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी टोकनाइजेशन पद्धत आरबीआयने सुरू केली. तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन साइटवरुन ऑनलाइन शॉपिंग केलीच असेल. या साइटवर तुम्ही एकदा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती अपडेट केली की प्रत्येक वेळी खरेदी करताना कार्डच्या डिटेल्स टाकण्याची गरज पडत नाही. मात्र, आता ही सुविधा आरबीआयने बंद केली आहे. त्याऐवजी ग्राहकांना मर्चंटकडे नोंदणी करून कार्ड टोकनाइज करता येईल. या टोकनच्या शेवटच्या चार आकड्यांद्वारे तुमचे कार्ड ओळखता येईल. आरबीआयने कार्ड टोकनाइज कसे करायचे याबाबत सहा सोप्या स्टेप्स दिल्या आहेत.
रुपे कार्डवर CVV शिवाय फक्त OTP ने व्यवहार करता येणार
टोकनाइज रुपे कार्ड धारकांना आता विना CVV फक्त ओटीपी क्रमांक टाकून ऑनलाइन व्यवहार पूर्ण करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने रुपे कार्डधारकांसाठी ही सुविधा पेमेंट गेटवे कंपनी RazorPay सोबत मिळून आणली आहे. सध्या रुपे कार्डधारक रॅपिडो, पोर्टर अशा साइटवर विना CVV पेमेंट करू शकतात. भविष्यात इतरही मर्चंटकडे ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. कारण, रुपे कंपनी इतर पेमेंट गेटवे कंपन्यांशी मिळून हे फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. यात PayU, सायबर सोर्स, फर्स्ट डेटा आणि पेटीएमचा सहभाग आहे.
सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता रुपे कार्डधारकांना सोप्या पद्धतीने ऑनलाइन व्यवहार करता यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो, असे रुपे कार्डचे प्रमुख डॅनी थॉमस यांनी म्हटले. NPCI ची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली असून रुपे कार्ड हे NPCI च्या अखत्यारीत येते.