Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pandharpur Wari 2023: रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर ते पंढरपूर 40 दिवसांची वारी, किमान खर्चात वारकऱ्यांना पंढरपूरचे दर्शन

Koundanyapur Wari 2023

Pandharpur Wari 2023: संत सदाराम महाराजांनी तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वारी 1594 साली सुरु केली. आई रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली पालखी महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे. ही पालखी तब्बल 40 दिवस पायी चालते. तर जाणून घेऊया या 40 दिवस पायी चालणाऱ्या वारीचे आर्थिक गणित.

Pandharpur Wari 2023: विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणीचे माहेर श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानातर्फे दरवर्षी नियमितपणे काढली जाणारी आषाढी एकादशीची वारी मे महिन्यातील 23 तारखेला पंढरपूरसाठी रवाना झाली. रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा हा 428 वर्षांपासून सुरु आहे. 2023 हे वारीचे 429 वे वर्ष आहे. रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले जाते. 

वशिष्ठा म्हणजेच आजची वर्धा नदीच्या काठावर असलेल्या ह्या पुरातन तिर्थक्षेत्रात हे रुक्मिणीचे पुरातन मंदिर आहे. कौंडण्यपूर येथे अनेक वर्षापूर्वी संत सदगुरु सदाराम महाराज होऊन गेले. संत सदाराम महाराजांनी तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वारी 1594 साली सुरु केली. आई रुक्मिणी  मातेच्या माहेराहून निघालेली पालखी महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे. ही पालखी तब्बल 40 दिवस पायी चालते. तर जाणून घेऊया या 40 दिवस पायी चालणाऱ्या वारीचे आर्थिक गणित.

40 दिवस पायी चालणाऱ्या वारकऱ्याला किती खर्च येत असेल?

रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर येथून 23 मे ला पालखीचे प्रस्थान झाले. ही पालखी तब्बल 428 वर्षापासून सुरू आहे. यात कौंडण्यपूर येथून 250 ते 300 वारकरी सहभागी होतात. वारीमध्ये सहभागी होण्यासाठी 1001 रुपये नोंदणी शुल्क द्यावे लागतो. कौंडण्यपूरवरून वारीत सहभागी झाल्यानंतर तेथून पुढील गावात त्यांचा मुक्काम असतो.

तेथे वारकऱ्यांच्या राहण्यासाठी जागा, नाश्ता, जेवण, औषधोपचार या सर्व सोई उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे वारकऱ्याला राहण्याचा आणि जेवणाचा खर्च येत नाही. नोंदणी शुल्क आणि आपल्या इतर खर्चासाठी लागणारे पैसे इतकाच खर्च पायदळ वारीमध्ये वारकऱ्याला येतो. कौंडण्यपूर ते पंढरपूर पोहचेपर्यंत वारकऱ्यांना 64 गावांमध्ये चहा, नाश्ता, जेवण आणि इतर सोयीसुविधा दिल्या जातात.

internal-image-4.jpg

त्या प्रत्येक गावात एखादी संस्था, ग्रामपंचायत, त्या गावातील वारकरी मंडळी यांच्याकडून वारीतील लोकांसाठी विविध सुविधा दिलेल्या असतात. वारकऱ्यांसाठी प्रत्येक गावात होणारा खर्च हा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला असतो. एखाद्या गावात तेथील ग्रामपंचायत हा खर्च देते, एखाद्या गावात मंदिर किंवा संस्थान वारकऱ्यांसाठी संपूर्ण खर्च करते. तर एखाद्या गावात वारकरीच विठ्ठल भक्तांसाठी सर्व सुविधांवर खर्च करतो. ज्या गावात मुक्काम असेल त्या गावातून वारकरी वारीमध्ये जुळतात, म्हणजेच आधीच्या गावापेक्षा समोरील गावात होणारा खर्च हा जास्त असतो.

निधीच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूरला मिळालेल्या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जातात. कोंडण्यपूरला अनन्य साधारण ऐतिहासिक पौराणिक महत्व आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून तिर्थक्षेत्र म्हणून काही निधी दिला जातो. त्यातून काही प्रमाणात विकासकामे चालू आहेत. संस्थानातर्फे अनेक धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम चालविले जातात. 

प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथील धर्मशाळेचे नुतनीकरण व विस्तारीकरण, असे उपक्रम राबविले जात आहेत. नवीन उपक्रमात वारकरी संस्कार शिबिर, वारकरी शिक्षण संस्था आणि क्षी क्षेत्र पंढरपूर व श्री तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील धर्मशाळेचे जिर्णोद्धार करण्याचा संस्थान तर्फे विचार सुरु आहे.

कौंडण्यपूर वारकऱ्यांसाठी नियम व अटी

  • वारकरी नोंदणी फी 1001 रुपये राहील.
  • वारकऱ्यांनी ओळखपत्र व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे.
  • टाळ सोबत आणावा, नसल्यास पताका घ्यावी लागेल.
  • शिस्तीचे पालन करावे लागेल. 
  • हरीपाठ व किर्तनाकरिता नेहमी हजर राहणे आवश्यक आहे. 

कौंडण्यपूर मंदिराच्या परिसरात छोट्या व्यवसायिकांची गर्दी

कौंडण्यपूर येथे फक्त आषाढी, कार्तिकी एकादशीलाच नाही तर वर्षभर सुद्धा गर्दी असते. नवविवाहित जोडपे आशीर्वाद घेण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तिथे येतात. असे म्हणतात की, रुख्मिणी मातेच्या माहेरी आल्यानंतर सुवासिनी महिलांनी तेथील कुंकू विकत घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे तेथील परिसरात वर्षभर कुंकू, ओटी, फुलांचा हार, फुले इत्यादींचे दुकान असते. त्याचबरोबर बांगड्या, नारळ, शोभेच्या वस्तु इत्यादींची सुद्धा चांगली विक्री होते. यातून इथली स्थानिक अर्थव्यवस्था वर्षभर सुरू राहते.

internal-image-3.jpg

येथील काही व्यवसायिकांशी ‘महामनी’ने चर्चा केली असता ते सांगतात की, या परिसरात अनेक दुकाने ओटी, नारळ, फुलांचे हार ही आहेत. आता येणारे भाविक संगळ्यांकडून कसे घेणार, त्यामुळे आम्हाला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पार्किंगची सुविधा त्याचबरोबर पाणी आणि इतर काही बेसिक सुविधा सुद्धा त्यांना द्यावा लागतात. इतके करूनही आमचा व्यवसाय हा नशिबावर अवलंबून असल्यासारखा आहे. संपूर्ण पूजेचे सामान 50 रुपयांमध्ये दिले जाते. दिवसाला आम्ही कधी 500 तर कधी एकही रुपया कमावत नाही.

लहान मुलांच्या आनंदासाठी जलपरी बोटिंग व्यवसाय

पंढरपूरची चंद्रभागा तशीच कौंडण्यपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी वर्धा हीच चंद्रभागा आहे. भाविक तिथे पूजा करतात आणि जणूकाही आपण पंढरपूरच्या चंद्रभागेत असल्याचा आनंद घेतात. इतकेच मर्यादित नाही तर तिथे जलपरी बोटिंग म्हणून छोटा व्यवसाय चालवला जातो. वर्धा नदीचे पात्र फिरण्यासाठी आणि बोटिंग करण्यासाठी लहान मुलांचे 20 रुपये आणि बाकीच्याकडून 30 रुपये चार्ज घेतले जातात. 

internal-image-2.jpg

जास्तीत जास्त लहान मुले या बोटिंगचा आनंद घेतात. जलपरी बोटिंग व्यवसाय चालवणारे व्यावसायिक केवदे यांच्याशी ‘महामनी’ने चर्चा केली असता ते सांगतात की, आम्ही दिवसाला 500 रुपये कमाई करतो. येथे येणाऱ्या भविकांवर आमचे इन्कम अवलंबून असते. हा व्यवसाय आम्ही लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी स्थापन केला आहे. येथील गर्दीमध्ये छोटे मुलं पालकांना त्रास देतात, त्याचे दर्शन व्यवस्थित होत नाही त्यामुळे आम्ही ही कल्पना करून व्यवसाय स्थापन केला.