घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाला (Ghatkopar-Mankhurd Link Road flyover) लागून हा उपरस्ता किंवा कनेक्टर म्हणता येईल तो तयार करण्यात आला. डंपर आणि ट्रकसाठी खरं तर हा रस्ता बांधला. यासाठी 11 ते 12 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले. मात्र ओव्हरहेडवर हाय-टेन्शन केबल्समुळे (High-tension cables) या रस्त्यावरून जाणं अवघड झालंय. विशेष म्हणजे ज्या अवजड वाहनांसाठी हा रस्ता केलाय, त्यांनाच याचा उपयोग करता येत नाही. या तारा स्थलांतरित करण्याची योजना आखण्यात आली. मात्र त्यालादेखील आता एक वर्ष उलटलंय. अद्याप काहीही काम त्यावर झालेलं नाही. मिड डेनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
ओव्हरहेड हाय टेंशन वायरचा अडथळा
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचा हा रस्ता खुला होऊन जवळपास दोन वर्षे उलटली. मात्र ओव्हरहेड हाय टेंशन वायर असल्यानं अवजड वाहनांना या रस्त्याचा वापर करता येत नाही. देवनार डम्पिंग ग्राऊंड आणि फ्लायओव्हर यांना जोडणारा हा रस्ता अतिरिक्त निधी वापरून बांधण्यात आला. विशेषतः घनकचरा डंपर्स जे शहरातला कचरा डंपिंग ग्राऊंडपर्यंत नेतात अशा वाहनांना वाहतूक करण्यासाठी याचा वापर अपेक्षित आहे.
प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
2021मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) अंदाजे 250 मीटर लांबीच्या कनेक्टरसाठी उड्डाणपूल बांधताना अतिरिक्त 11 कोटी रुपये खर्च केले. मात्र याचा उपयोग होताना दिसत नाही. माजी नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले, की गोवंडी-मानखुर्दमधल्या रहिवाशांनी कचरा कुंपणांमुळे दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडला कनेक्टर बांधण्याची सूचना आम्ही केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होतंय. हाय-टेन्शन वायरमुळे एक तर रस्त्यावरून जाण्याची परवानगी दिली जात नाही तर दुसरीकडे बीएमसी ही समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही, असा आरोप त्यांनी केला.
उच्च-प्रवाहाच्या तारांबाबत आणि कनेक्टर रोडच्या कडेला नॉइस बिअरर्स बसवण्यासाठी सातत्यानं अधिकाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहोत, असं स्थानिक रहिवासी फैयाज आलम शेख यांनी सांगितलं. तर वायरची उंची वाढवण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कमला रमण नगरमधल्या घरांजवळून जाताना कनेक्टरच्या बाजूनं नॉइस बिअरर्स उभं करण्यास काही समस्या आहेत का, याचा अभ्यास किंवा व्यवहार्यता तपासणं गरजेचं आहे. त्यावर काम सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय.
रस्त्याचा वापर होतोय दगड अन् डेब्रिस टाकण्यासाठी...
हा कनेक्टर रोड बंद असल्यानं त्यावर दगड आणि डेब्रिज टाकण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा कनेक्टर रस्ता उघडणं गरजेचा आहे. कारण कचरा डंपर आणि कॉम्पॅक्टर परिसरात खूप वेगानं धावतात. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही आहेच, असं फैयाज आलम शेख यांनी सांगितलं.
अधिकारी म्हणतायत, लवकरच काम सुरू होणार
बीएमसी पूल विभागातल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की नागरी अधिकाऱ्यांना स्थानिक समस्येची जाणीव आहे. त्यामुळे मानखुर्दमधल्या हाय-टेन्शन वायरची उंची वाढवण्याचं काम करत आहेत. अलीकडेच, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणानं अतिरिक्त खांब बांधण्यासाठी जमीन देण्याचं मान्य केलं आहे. लवकरच ज्या काही अडचणी आहेत, त्या सुटतील, असं अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलंय.
मूळ किंमतीत नंतर वाढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपूल प्रकल्पाची मूळ किंमत 467 कोटी रुपये होती. या रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत तो खर्च वाढून 732 कोटी रुपये झाला, त्यापैकी सुमारे 11 कोटी रुपये कनेक्टरवर खर्च झाले.