बांगलादेशात महागाईचा (Inflation in Bangladesh) भडका उडाला आहे. अन्नधान्यासह इतर दैनदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्याचे हाल होत आहेत. बांगलादेशात अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किंमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था ActionAid या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालात महागाईवर काय भाष्य केले आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
बांगलादेशात मागील दशकभरातील सर्वोच्च मासिक चलनवाढीचा दर नोंदवला गेला आहे. मे महिन्यात बांगलादेशातील महागाईचा दर 9.94% होता. बांगलादेश सांख्यिकी ब्युरो (BBS) यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली होती. जून महिन्यातही यामध्ये फारसा बदल दिसून आलेला नाही. वाढत्या महागाईमुळे बांगलादेशातील राहणीमानाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे उपेक्षित समुदायांवर अधिक परिणाम झाला आहे.
शिक्षण, पोषण आणि आरोग्याच्या खर्चात तडजोड-
या महागाई वाढीमुळे, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना अनेक आव्हानांना तोड द्यावे लागत आहे. विशेषत: महिला, मुली आणि मुले यांना शिक्षण, पोषण आणि आरोग्य यांसारख्या बाबींसाठी तडजोड करावी लागत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. परिणामी या किमती वाढीमुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. महिलांचे आरोग्य खालावत आहे तसेच मानसिक आरोग्य बिघडत असल्याचेही अॅक्शनए़ड या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
रशिया युक्रेन युद्धाचा ही परिणाम-
अॅक्शनए़डच्या अहवालानुसार रशिया-युक्रेन युद्धामुळे बांगलादेशात खताच्या किमती 105% आणि साखरेच्या किमती 60% ने वाढल्या आहेत.तसेच युद्ध सुरू झाल्यापासून देशातील पेट्रोलच्या किमती 47% आणि सॅनिटरी पॅडच्या किमतीमध्ये देखील 23% ने वाढ झाली आहे. बांगलादेश नैसर्गिक आपत्ती, रशिया-युक्रेन युद्ध, कोविड-19 मधील कर्जाचा ताण आणि चलन अवमूल्यन यासह अनेक संकटांच्या मिश्रित परिणामांना तोंड देत आहे. या घटकांपैकी, नैसर्गिक आपत्ती, आणि रशियाचे युक्रेन युद्ध याचे सर्वात लक्षणीय परिणाम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
शिक्षणाऐवजी रोजगारीला महत्त्व-
महागाईने होरपळत असलेल्या येथील कुटुंबांना मुलांच्या शिक्षणापेक्षा जगण्यासाठी अन्न मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथील लोक आपल्या मुलांना बांगलादेशातील जादुकाटा नदी परिसरातील दगडखाणीत किंवा वाळू उत्खननासाठी पाठवतात. त्यातून त्यांना दिवसाला 300 टका रोजगार मिळतो. त्यामुळे मुले देखील शाळा सोडून देत आहेत.
जून महिन्यातील बांगलादेशातील दर
खाद्य वस्तू | बांगलादेशी चलन (TAKA) | भारतीय रुपये |
दूध | 75 प्रति लिटर | 56.90 |
पीठ | 40.500 प्रति किलो | 30.72 |
साखर | 75.000 प्रति किलो | 56.90 |
खाद्य तेल | 497.500 प्रति किलो | 377.42 |
कांदा | 45.000 प्रति किलो | 34.14 |
टोमॅटो | 55.000 प्रति किलो | 41.72 |