सोनी वाहिनीवरील गाण्यांचा लोकप्रिय रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल सिझन 13’ (Indian Idol Season 13 Winner) चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 12 सिझन यशस्वीरीत्या पार पडले आहेत. 10 सप्टेंबर 2022 रोजी सुरु झालेला हा तेरावा सिझन प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला.
या कार्यक्रमात नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी या तिघांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर आदित्य नारायण याने सूत्रसंचालकाची धुरा सांभाळली. रविवारी (2 एप्रिल) पार पडलेल्या या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले मोठ्या थाटात पार पडला. ज्यामध्ये तेराव्या सिझनचा विजेता म्हणून ऋषी सिंहच्या (Rishi Singh) नावाची घोषणा करण्यात आली. त्याला बक्षिस म्हणून नेमके किती रुपये मिळाले हे आपण जाणून घेणार आहोत.
इंडियन आयडॉल 13 चा विजेता - ऋषी सिंह
‘इंडियन आयडॉल सिझन 13’ चा ग्रँड फिनाले 2 एप्रिल 2023 रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सिझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांकडून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळाली. या कार्यक्रमातील 6 स्पर्धक शेवटच्या राऊंडपर्यंत पोहोचले होते. ज्यामध्ये ऋषि सिंह, शिवम सिंह, बिदिप्ता चक्रवर्ती, देबोस्मिता रॉय, चिराग कोतवाल आणि सोना क्षिकर हे होते. या सर्व स्पर्धकांमधून ऋषी सिंह हा 13व्या सिझनचा विजेता ठरला.
आयोध्येचा मूळ रहिवासी असणारा ऋषी सिंह याने इंडियन आयडॉल सिझन 13च्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले आहे. या कार्यक्रमात सामील होण्यापूर्वी ऋषी मंदिरामध्ये आणि गुरुद्वारात गाणे गायचा. त्याच्या मेहनतीमुळे आणि सुंदर आवाजाच्या जादूमुळे तो या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याला ट्रॉफीसोबत 25 लाखांचा चेक आणि मारुती सुझुकी कंपनीची ‘ब्रीझा’ ही नवीकोरी कारही देण्यात आली आहे.
पहिला आणि दुसरा रनर अप जाणून घ्या
याशिवाय सिझन 13 चा पहिला रनर अप म्हणून देबोस्मिता रॉय तर दुसरा रनर अप म्हणून चिराग कोतवालची निवड केली गेली. या दोघांनाही प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आले. इंडियन आयडॉल सिझन 13च्या ग्रँड फिनालेला ‘बेस्ट डान्सर 3’ या रियालिटी डान्स शोचे परीक्षक गीता कपूर, टेरेंस लुईस आणि सोनाली बेंद्रे यांनी हजेरी लावली होती. याशिवाय भारती सिंहने तिच्या मजेशीर कॉमेडीने या कार्यक्रमात रंगत आणली होती.