तांदूळ आणि पाम तेलाच्या किंमती भारतामध्ये वाढल्या आहेत. मागील एक महिन्यामध्ये तांदळाच्या किंमती सुमारे 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर पाम तेलाच्या किंमतीमध्ये लिटरमागे पाच ते सात रुपयांची वाढ दिसून येत आहे. बासमती तांदळाचे दर अधिक वाढले असून 110 रुपये किलोच्या दराने विक्री होत आहे. मागील महिन्यात बासमती दांतळाचे दर 95 रुपये किलो होते.
भविष्यातमध्ये तांदळाला चांगला भाव मिळेल या आशेने मिल मालक तांदळाचा साठा करुन ठेवत आहेत. कारण, पाकिस्तानमध्ये पुरामुळे तांदळाचे पिक पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. जागतिक स्तरावर तांदळाच्या किंमती वाढल्यावर बाजारात माल विक्री करता येईल, असा विचार मिल मालक करत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय बासमती तांदळाला इरामधून मोठी मागणी असते. मात्र, सध्या इराणकडूनही तांदळाला मागणी नाही. एखादी दुसरी ऑर्डर इराणकडून येत असतानाही भारतात किंमती वाढत आहेत, असे राइस व्हिला ग्रुपचे सुरच अगरवाल यांनी म्हटले आहे.
खरीप हंगामामध्ये तांदळाचे उत्पादन घटल्याने इतर तांदळाच्या इतर व्हरायटीजचे सुद्धा भाव वाढत आहेत. कोरोना काळात सुरू केलेली गरीब कल्याण अन्न योजना डिसेंबरपासून बंद करण्यात आली. सोबतच सरकारी अन्न सुरक्षा योजना बंद करण्यात आली आणि नेपाळला करमुक्त तांदळाची निर्यात करण्यास परवानगी दिल्याने देशांतर्गत बाजारात दर वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2022-23 खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन 104.99 मिलियन टन होण्याची अपेक्षा आहे. मात्र, 2021-22 वर्षात तांदळाचे उत्पादन 111.76 टन झाले होते. मागील वर्षीपेक्षा उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे तांदळाचे दर वाढले आहेत.
इंडोनेशिया आणि मलेशिया देशांमधून भारतामध्ये पाम तेल आयात होते. स्थानिक बाजारपेठतील किंमती नियंत्रित करण्याच्या प्रयत्नामुळे आयात शुल्क वाढू शकते. तसेच आयात देश कच्चे तेल निर्यात करण्यापेक्षा तयार माल निर्यात करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे पाम तेल्याच्या किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान पाम तेलाच्या किंमती जास्त वाढल्या होत्या. मात्र, सरकारच्या हस्तक्षेपानंतर देशात किंमती नियंत्रणात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा पाम तेलाच्या किंमती वाढत आहेत.