Retail Inflation in 2023: देशात किरकोळ महागाईने मागील 15 महिन्यांत उच्चांक गाठला आहे. भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किंमती प्रामुख्याने वाढल्या. जुलै महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई 7.44 टक्क्यांवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा महागाईचा दर जास्त आहे.
भाजीपाल्याच्या किंमती सर्वाधिक वाढल्या
यापूर्वी 2022 साली मे महिन्यात किरकोळ महागाई 7.79 टक्क्यांवर पोहचली होती. त्यानंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. देशभरात मागील दोन महिन्यांपासून भाजीपाल्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. टोमॅटोच्या किंमती मागील तीन महिन्यात 1400 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोबतच डाळी, तृणधान्ये, पेये, इंधन, वीज महागली आहे. अस्थिर मान्सून महागाई वाढीमागील एक मोठे कारण आहे.
अर्थतज्ज्ञांचा अंदाजही चुकला
रियटर्स या आघाडीच्या माध्यम समूहाने ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) किती राहील याबाबत 52 अर्थतज्ज्ञांचा अंदाज घेतला होता. 6.40 % पर्यंत किरकोळ महागाई राहील, असे या सर्व अर्थतज्ज्ञांनी पोलमध्ये म्हटले होते. मात्र, त्यापेक्षाही महागाईचा दर जास्त राहिल्याने सर्वांना धक्का बसला आहे. येत्या काळात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI व्याजदर वाढीबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशात 2 ते 6% किरकोळ महागाईची मर्यादा रिझर्व्ह बँकेने निश्चित केली आहे. (Retail Inflation) मात्र, महागाईची कमाल मर्यादा जुलै महिन्यात ओलांडली गेली. मागील चार महिन्यात महागाई 2-6% च्या मर्यादेत होती. मात्र, आता 7 टक्क्यांचा आकडा पार केला.
कशाचे दर सर्वाधिक वाढले?
भाजीपाल्याचे देशातील दर 37.34 टक्क्यांनी वाढले. अन्नपदार्थ आणि पेये यांची महागाई 10.57%, तृणधान्यांच्या किंमती 13.04 टक्के वाढल्या आहेत. वीज आणि इंधनाच्या किंमतीही साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका
ऑगस्ट महिन्यात महागाई खाली येण्याची चिन्हे दिसत नाहीत. (Retail Inflation) पुढील काही महिन्यात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सारखे मोठे सण आहेत त्यामुळे महागाई कमी राहण्याची शक्यता कमी आहे.