आरबीआयने आपल्या क्लीन नोट पॉलिसीचा एक भाग म्हणून 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आणि देशभरातील पेट्रोल पंप, रेस्टॉरन्ट आणि मोठमोठ्या शॉपिंग सेंटरमधील रोख व्यवहार वाढले. विशेषत: 2000 हजार रुपयांच्या नोटांमधून सर्वाधिक व्यवहार होऊ लागले.
रिझर्व्ह बँकेने जरी 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याची मुदत दिली असली तरी, अनेकांनी या नोटा बदलून घेण्याऐवजी त्या खर्च करण्याला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. याच संधीचा फायदा घेत अनेक व्यापाऱ्यांनी आरबीआयची मोहीम 100 टक्के राबवण्यासाठी आपला अजेंडा चालवण्यास सुरूवात केली. दोन हजार रुपयांची नोट बँकेत बदलण्याऐवजी आमच्याकडे येऊन खरेदी करा आणि तुमच्या नोटा बदलून घ्या असा छुपा अजेंडा राबवण्यास सुरूवात केली.
या छुप्या अजेंड्यामध्ये गुजरातमधील निनीज् किचन या रेस्टॉरंटने बाजी मारली आहे. या रेस्टॉरंटने गुजरातमधील टाईम्स ऑफ इंडियाच्या Ahmedabad Times या पुरवणीच्या पहिल्या पानावर आपल्या रेस्टॉरंटची जाहिरात छापली आहे आणि या जाहिरातीत त्यांनी, Pink is the New BLACK अशी ओळ टाकली आहे. त्याचबरोबर, We Accept BLACK (PINK) Money असेही म्हटले आहे.
आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता तुमच्याकडील ब्लॅक मनी जो पिंक नोटांमध्ये उपलब्ध आहे. तो आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत, अशी एकप्रकारची जाहीर ऑफरच या रेस्टॉरंटने दिली आहे.
पिंक इज द न्यू ब्लॅक
पिंक इज द न्यू ब्लॅक (Pink is the New BLACK) ही टॅगलाईन खूप काही सांगून जाते. म्हणतात ना 'समझदारो को इशारा काफी है' या पठडीत बसणारी ही लाईन आहे. पूर्वी पाचशेच्या नोटांना हरी पत्ती म्हटले जायचे. तसेच 2000 रुपयांच्या नोटेला पिंक नोट म्हटले जाते. निनीज् किचनचे मालक अंकित गुप्ता यांनी 4 जूनला ही जाहिरात दिली होती. त्यांचे असे म्हणणे की, या जाहिरातीनंतर त्यांच्या रेस्टॉरंटमधील रोख व्यवहारात 25 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे त्यांनी ही जाहिरात आठवड्याभराने पुन्हा दिली.
We Accept BLACK (PINK) Money
आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, लगेच 2-3 दिवसांनी दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या संख्येने व्यवहारात आल्या. झोमॅटो कंपनीकडे तर 72 टक्के ऑर्डर या कॅशमध्ये आणि त्यातही 2000 रुपयांच्या नोटांच्या आल्या होत्या. म्हणजेच We Accept BLACK (PINK) Money, या ओळीतील अर्थानुसार तुमच्याकडे असलेल्या काळ्या पैशातील दोन हजारांची पिंक नोट तुम्ही बँकेऐवजी आमच्याकडून एक्सचेंज करून घेऊ शकता, हे आकर्षित करणारे ठरले. कारण बँकेत किती नोटा बदलून घेणार? त्याचा हिशोब कोण ठेवणार? त्याऐवजी खर्च करून त्यातून सुटका करून देण्यावर अनेकांनी भर दिल्याचे दिसून येते.
जशा अनेकांनी दोन हजारांच्या नोटा बदलून देण्याच्या ऑफर, जाहिराती केल्या. तशा बऱ्याच जणांनी त्या स्ट्रिकली घेणार नसल्याचेही सांगितले. यामुळे अनेक ठिकाणी वाद झाल्याचेही दिसून आले. जरी या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत कायद्याने वापरता येणार असल्या तरी अनेकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण असल्याने ते नोटा जास्तीत जास्त खर्च करण्यावर भर देत आहेत.
Source: www.theprint.in