Only 10 Notes Exchanged At A Time: रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नोटांबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही नागरिक याला संपूर्ण नोटबंदी झाल्याचे म्हणत आहेत. पण आरबीआयने स्पष्ट केले आहे की, फक्त 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत 2000 च्या नोटा पूर्णपणे वैध असणार असून त्यांचे बाजारातले व्यवहार सुरु राहणार आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटेने व्यवहार करण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही.
Table of contents [Show]
काय सांगते RBI चे परिपत्रक
RBI ने 19 मे च्या परिपत्रकात म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या जातील. या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध राहतील. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत; ते बँकेत जमा करू शकतात किंवा इतर मूल्यांच्या नोटा बदलून घेऊ शकतात. बँकांमध्ये नोटा एक्सचेंज करण्याची ही सुविधा 23 मे पासून सुरू होणार असून, 30 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत
आरबीआयचे म्हणणे आहे की, 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या नोटांमध्ये एक्सचेंज करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. कोणत्याही बँकेत एकावेळी 2 हजार रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये एक्सचेंज केले जाऊ शकतात. तसेच सर्व बँका 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा एक्सचेंज करण्याची सुविधा देतील.
2000 ची नोट असल्यास काय करावे?
ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत. त्यांनी बँकेत जाऊन एकतर नोटा जमा कराव्यात किंवा एक्सचेंज करुन घ्याव्यात. दोन हजार रुपयांच्या बदल्यात इतर चलनी (मूल्यांच्या ) नोटा बँकेकडून देण्यात येतील. 30 सप्टेंबरपर्यंत ही सुविधा सुरू असेल. आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयातही नोटा बदलून घेता येतील.
2000 रुपयांची नोट बनावट असल्यास?
बदली प्रक्रियेत बँकेला कोणतीही बनावट नोट आढळून आल्यास, ती नोट जप्त केली जाईल आणि बनावट नोटेवर शिक्का लावला जाईल. अशी प्रत्येक जप्त केलेली नोट प्रमाणीकरणाच्या अंतर्गत (Under Authentication) वेगळ्या रजिस्टरमध्ये प्रविष्ट केली जाईल. बनावट नोटा कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला परत केल्या जाणार नाहीत किंवा त्याऐवजी कोणतीही रक्कम अथवा एक्सचेंज मूल्य दिले जाणार नाही.