बाजारात नव्या घरांचा पुरवठा कमी झाल्याने सदनिकांची पुनर्विक्री वाढली आहे. तयार घरे किंवा तयार होण्याच्या मार्गावर असलेल्या घरांची पुनर्विक्री जोरात सुरू आहे. घर घेण्यास इच्छुक असलेल्यांकडून पुनर्विक्रीसाठीच्या घरांना पसंती मिळत आहे. कारण, बाजारात नव्या सदनिकांचा पुरवठा रोडावला आहे. त्यामुळे नव्या मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या आहेत.
नव्या घरांचा पुरवठा रोडावला
देशातील बड्या शहरातील मोठे बांधकाम प्रकल्पाची कामे रेंगाळली आहेत. तसेच नवे प्रकल्पही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सुरू झाले नाहीत. मात्र, ग्राहक घर घेण्यासाठी जास्त वाट पाहण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुनर्विक्रीसाठी असलेल्या सदनिकांची मागणी वाढल्याचे नो ब्रोकर कंपनीचे सह-संस्थापक सौरभ गर्ग यांनी म्हटले.
तयार घरांची मालकांकडून विक्री
मागील सहा महिन्यात पुनर्विक्रीसाठीच्या तयार (रेडी टू मूव) घरांची संख्या दुपटीने वाढली आहे. नो ब्रोकर्स कंपनीच्या माहितीनुसार, बंगळुरू, पुणे, मुंबई आणि इतर काही शहरात 3BHK आणि मोठ्या मालमत्ता पुनर्विक्री वाढली आहे. जे ग्राहक आलिशान घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्याकडून सर्वाधिक रिसेल घरांना पसंती दिली जात आहे.
ज्या ग्राहकांनी 3-4 वर्षांपूर्वी मालमत्ता खरेदी केली होती ती घरे आता तयार झाली आहेत. मात्र, सध्या नव्या घरांचा पुरवठा जास्त होत नसल्याने या जुन्या घरांचा सेल वाढला आहे. घरमालकही चांगली किंमत मिळत असल्याने विक्री करण्यावर भर देत आहेत.
पुनर्विक्रीसाठीची घरे 15 ते 30 टक्क्यांनी स्वस्त
नव्या घरांपेक्षा रिसेलसाठी असलेल्या घरांची किंमती थोडी कमी असते. तसेच कार्पेट एरियासुद्धा जास्त असतो. त्यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो. जे ग्राहक कमी पैशात चांगली मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत ते रिसेलसाठी असलेले घर घेण्याचा निर्णय घेत आहेत. नव्या घरांपेक्षा रिसेल घरांची किंमत 15 ते 30 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येत आहे.