Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group Crisis: ‘ही’ बातमी अदानी टोटल गॅसची घसरण थांबवणार?

Adani Group

Image Source : www.deccanherald.com,www.trendlyne.com

Adani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हिंडनबर्गचा अहवाल जाहीर झाल्यानंतर 24 जानेवारीपासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप करणारा अहवाल प्रकाशित केला आणि गौतम अदानी यांच्या समूहातील कंपन्यांचे शेअर्स गडगडू लागले. हिंडेनबर्ग अहवालातून अदानी शेअर्सची किंमत जास्त (ओवरव्हॅल्यू) असल्याचा दावा केला गेला.  या वेळेपासून  स्टॉक्समध्ये घसरण  सुरु झाली. महिना उलटल्यानंतरही ही घसरण  अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. 

अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्सची वाताहात होताना दिसत आहे. मात्र यापैकी सर्वात मोठे नुकसान हे अदानी टोटल गॅसच्या शेअर्सचे झालेले दिसून येत आहे. 23 जानेवारी रोजी म्हणजे हिंडनबर्ग अहवाल जाहीर होण्यापूर्वी  या कंपनीचा शेअर 3 हजार 998.50  रुपये किमतीवर ट्रेड  करत होता. हा मागील 52 आठवड्यामधील  उच्चांक होता.  पण त्यानंतर आलेल्या हिंडेनबर्ग अहवालाने ग्रुपच्या इतर कंपन्यांप्रमाणे अदानी टोटल गॅसचा स्टॉक आतापर्यंत 80 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.  मात्र आता या शेअरची घसरण थांबेल काय, असा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे पुढे आलेली एक बातमी आहे.

काय आहे ही दिलासादायक बातमी?

शेअर्समधील घसरणीच्या काळात कंपनीसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीच्या धामरा टर्मिनलवर एप्रिलमध्ये पहिला एलएनजी माल पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात  आहे. ही शिपमेंट आल्यानंतर  1 महिना ते 45 दिवसांनी तेथून व्यावसायिक कामकाजाला सुरुवात होईल.  म्हणजेच जूनच्या मध्यात काम सुरू होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

वार्षिक पाच दशलक्ष टन क्षमतेचे हे एलएनजी टर्मिनल 2021 या वर्षी  सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होणार होते परंतु त्याला विलंब झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा 6 टक्केवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखली असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वरील टर्मिनल महत्त्वाचे मानण्यात येत आहे. धामरा टर्मिनलमुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये गॅसच्या वापराला चालना मिळणार आहे. पूर्व किनारपट्टीवरील हे देशातील दुसरे आयात टर्मिनल आहे. तसेच, पश्चिम किनारपट्टीवर पाच आयात टर्मिनल आहेत.
मागील महिन्याभरात अदानी टोटल गॅसचा शेअर 80 टक्क्यापेक्षा जास्त घसरला  असून सध्या त्याला सतत लोअर सर्किटला सामोरे जावे लागत आहे. 23 जानेवारी रोजी शेअर 3998.50 रुपयाच्या आपल्या उच्चांकावर ट्रेड करत  होता. यानंतर शुक्रवार 24 फेब्रुवारीअखेर  आदल्या दिवशीच्या तुलनेत  5 टक्क्यांनी  घसरून हा शेअर  753.60 वर बंद झाला आहे. महिनाभरात हा शेअर्स 3244.9  रुपयांनी खाली घसरला आहे. मात्र आता पुढे आलेल्या या घडामोडीनंतर  शेअर्सची स्थिती शेअर बाजारात सुधारते का, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.