रिलायन्स इंडस्ट्रीजने किरकोळ व्यापार क्षेत्रात आपली दावेदारी मजबूत केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेल व्यवसायातील जर्मन कंपनी मेट्रो कॅश अॅंड कॅरी इंडिया या कंपनीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने आज शेअर मार्केटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ झाली. रिलायन्सचा शेअर 2600 रुपयांवर गेला होता.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) या कंपनीकडून मेट्रो कॅश अॅंड कॅरीचे 100% हिस्सा खरेदी केला जाणार आहे. हा संपूर्ण व्यवहार रोख रकमेत होणार असून रिलायन्स 2850 कोटींमध्ये मेट्रो कॅश अॅंड कॅरीची खरेदी करेल.मेट्रो कॅश अॅंड कॅरी ही जर्मन कंपनी मेट्रो एजी (Metro AG) ची भारतीय उपकंपनी आहे. कंपनी घाऊक व्यापारामध्ये आहे.
खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स रिटेल देशभरातील मेट्रो कॅश अॅंड कॅरीच्या स्टोअरवर ताबा मिळवेल. त्याशिवाय मेट्रो कॅश अॅंड कॅरीशी जोडलेल्या हजारो किराणा व्यावसायिकांना आता यापुढे रिलायन्स सेवा देणार आहे. मार्च 2023 पर्यंत हा व्यवहार पूर्ण होईल, असे रिलायन्स रिटेलने म्हटले आहे.
मेट्रो कॅश अॅंड कॅरीच्या अधिग्रहणामुळे रिलायन्सला किराणा व्यवसायात आणखी घट्ट पाय रोवून उभे राहता येईल, असा विश्वास रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका इशा अंबानी यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या भारतातील घाऊक बाजारपेठेत मेट्रो इंडिया एक आघाडी कंपनी आहे. त्यांची पुरवठा यंत्रणा प्रचंड मोठी असून त्याचा आता रिलायन्सला लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले. मेट्रो कॅश अॅंड कॅरीने 2003 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. कंपनीचे देशभरात 31 घाऊक वितरण केंद्र आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मेट्रोचा 34 देशांमध्ये विस्तार आहे. रिलायन्स रिटेलचे भारतात 16600 स्टोअर आहेत.
आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये 0.60% वाढ झाली होती. इंट्रा डेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2606.65 रुपयांपर्यंत गेला होता. त्यानंतर मात्र शेअरवर दबाव वाढला. सेन्सेक्स आणि निफ्टीतील घसरणीची झळ रिलायन्सला बसली. बाजार बंद होताना रिलायन्स 2577.90 रुपयांवर स्थिरावला. त्यात 0.25% घसरण झाली.