चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Reliance Industries Limited) निव्वळ नफा 15 टक्क्यांनी घसरून 15,792 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला (Share Market) सांगितले की 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा 15,792 कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 18,549 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून रु. 2,20,592 कोटी झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 1,91,271 कोटी रुपये होते. रिलायन्सचे म्हणणे आहे की तिचा EBITDA वार्षिक 13.5 टक्क्यांनी वाढून रु. 38,460 कोटी (4.6 अब्ज डॉलर) झाला आहे.
रिलायन्स जिओचा फायदा
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 28.3 टक्क्यांनी वाढून 4,638 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने शुक्रवारी ही माहिती दिली. रिलायन्स जिओने शेअर बाजाराला सांगितले की, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच तिमाहीत 3,615 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून रु. 22,993 कोटी झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 19,347 कोटी होते.
ग्राहकांची संख्या वाढली
कंपनीने म्हटले आहे की रिलायन्स जिओ 5G नेटवर्क सेट करत आहे आणि विद्यमान वायरलेस आणि वायरलाइन नेटवर्क क्षमता वाढवत आहे. जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी मुख्यत्वे डिजिटल सेवा पुरवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीच्या मते, डिसेंबर तिमाहीअखेर तिची निव्वळ संपत्ती रु. 2,11,281 कोटी होती, जी सप्टेंबरमध्ये रु. 2,06,644 कोटी आणि मागील वर्षीच्या तिमाहीत रु. 1,93,616 कोटी होती.
डेटा ट्रॅफिकमध्ये 23.9% वाढ
आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसर्या तिमाहीत, रिलायन्स जिओचा एकूण डेटा ट्रॅफिक 23.9% वाढून 29.0 अब्ज जीबीवर पोहोचला आहे. एकूण व्हॉइस ट्रॅफिक देखील 10.4% ने वाढून 1.27 ट्रिलियन मिनिटे झाले. प्रत्येकाला 5G नेटवर्कशी जोडण्याची वचनबद्धता पुढे नेत, Jio ने भारतातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 134 शहरे त्यांच्या True5G नेटवर्कने जोडली आहेत. कंपनीने म्हटले आहे की डिजिटल कॉमर्स आणि नवीन कॉमर्स व्यवसायांनी अधिक मजबूत कामगिरी केली, 38% वार्षिक वाढ नोंदवली आणि महसुलात 18% योगदान दिले.