JioMart Layoff: ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायातील तीव्र स्पर्धेचा फटका रिलायन्स जिओ मार्टला बसला आहे. कंपनीने 1 हजार कर्मचारी कपात केली असून येत्या काही दिवसांत विविध विभागातील 15 हजार कर्मचारी कपात करण्याचे नियोजन आखल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करण्यासाठी वेळ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मेट्रो कॅश आणि करी ब्रँड विकत घेतला
जिओ मार्टने नुकतेच जर्मन कंपनी मेट्रो कॅश आणि करी चा भारतातील व्यवसाय विकत घेतला. त्यानंतर कंपनीची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे. होलसेल विभागातील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक नोकऱ्या जाऊ शकतात. सध्या जे 1000 कर्मचारी कामावरुन कमी करण्यात आले आहेत त्यातील 500 एक्झिक्यूटिव्ह श्रेणीतील आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.
मेट्रो कॅश आणि करी ही कंपनी विकत घेतल्यामुळे त्या कंपनीतील 3500 कर्मचारी जिओ मार्टमध्ये विलीन झाले. त्यामुळे विविध विभागांमध्ये अतिरिक्त कर्मचारी झाले आहेत. मात्र, त्यामुळे कंपनीच्या खर्चामध्ये वाढ होत होती. या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ऑनलाइन विक्री आणि व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायातील स्पर्धा
मागील काही वर्षात ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स देण्यात येत आहेत. मात्र, स्पर्धेमुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच व्यवस्थापनाचा खर्च वाढत असल्याने कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. तोटा कमी करून नफ्याचे प्रमाण वाढवण्याकडे जिओ मार्टने लक्ष केंद्रित केले आहे.
150 आउटलेट बंद करणार
रिलायन्स जिओ खर्च कमी करण्यासाठी ऑनलाइन डिलिव्हरीसाठी सुरू केलेली 150 आउटलेट देखील बंद करणार आहे. या आउटलेटद्वारे इतर किराणा दुकानांनाही सामान पोहचवले जात होते. रिलायन्सने मेट्रो कॅश अँड करी हा व्यवसाय 2,850 कोटींना विकत घेतला. या कंपनीचे 31 स्टोअर्स आता जिओच्या ताब्यात आली आहेत.
देशातील संघटीत क्षेत्रातील होलसेल व्यवसाय (FMCG) फक्त 10-15% इतकाच आहे. त्यातही सर्वात जास्त वाटा रिलायन्सचा आहे. हा वाटा दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहकोपयोगी उत्पादने असणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात B2B मॉडेलमध्ये शिफ्ट होत आहे. त्यामुळे पारंपरिक वितरण व्यवसायाला धक्का पोहचू शकतो.
2022-23 आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेल व्यवसायाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले. एकाच वर्षात कंपनीने 3,300 नवे आऊटलेट सुरू केले. त्यामुळे कंपनीचे सध्या 18,040 रिटेल स्टोअर्स आहेत. सामान साठवण्यासाठी 12.6 मिलियन स्केअर फूटचे नवे गोदाम देखील उभी केली आहेत.