देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आपला 4G फोन 'Jio Bharat V2' नुकताच लॉन्च केला आहे. हा फोन भारतभरात केवळ 999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रिलायन्स जिओने या मोबाईल फोनला ‘जिओ भारत’ असे नाव दिले आहे. हा मोबाईल ग्राहकांना इंटरनेट सुविधा देहील देणार आहे हे विशेष. युजर्सला 4G इंटरनेट सुविधेचा वापर या मोबाईलद्वारे करता येणार आहे.
सामन्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हा मोबाईल उपलब्ध करून दिल्यामुळे येत्या काळात याचा वापर ग्रामीण भागात वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सदर मोबाईल फोन केवळ जिओ नेटवर्क समर्थित असणार आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कुठल्या कंपनीचे सिमकार्ड यात वापरता येणार नाहीये. या मोबाईलसाठी रिलायन्स जिओने एक रिचार्ज प्लॅन देखील जाहीर केलाय.
#WATCH | Visuals of JioBharat V2 4G Phone with an MRP of Rs 999, the lowest entry price for an internet-enabled phone. The monthly plan is 30% cheaper and has 7 times more data compared to feature phone offerings of other operators. The phone has plans including Rs 123 for 28… pic.twitter.com/xBbALCAoA9
— ANI (@ANI) July 3, 2023
123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या फोनच्या ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी 123 रुपये द्यावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 14GB 4G डेटा देणार आहे. सामान्य इंटरनेट युजर्ससाठी हा डेटा पुरेसा असणार आहे. सध्या ग्रामीण भागात 5जी सेवा पुरवण्यावर सर्व टेलीकम्युनिकेशन कंपन्या लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र जो ग्राहकवर्ग अजूनही 2G नेटवर्क वापरत आहेत, अशांना आकर्षित करण्यासाठी जिओने हा प्लॅन आणला आहे. देशभरात सुमारे 25 कोटी ग्राहक अजूनही 2G नेटवर्क सेवा वापरत आहेत. हे सर्व ग्राहक ग्रामीण भागातील आहेत.
हा मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिवसाला सरासरी 4.16 रुपये खर्च येणार आहे. इंटरनेट सुविधेचा फायदा घेण्यासाठी ही रक्कम अत्यल्प असून याद्वारे ग्रामीण भागातील जनतेला ‘डिजिटल इंडिया’ अभियानात सामील करून घेतले जाणार आहे. सध्या रिलायन्स जिओ 5G नेटवर्कचा प्रसार देशभरात करत आहे. सोबतच आपली ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कंपनीकडून केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून कंपनीने ‘जिओ भारत’ फोन केवळ 999 रुपयांत लॉन्च केलाय.