• 05 Feb, 2023 12:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance Jio चा Jio Book लॅपटॉप आता 15,700 रुपयांमध्ये 

Reliance Jio

Image Source : www.firstpost.com

Reliance Jio ने भारतातला सगळ्यात स्वस्त लॅपटॉप ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच केला. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांच्यासाठी असलेला हा लॅपटॉप आता कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. रिलायन्स डिजिटलवर त्याची नोंदणी सुरू झाली आहे.

रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने मोबाईल नेटवर्क क्षेत्रात स्वस्त डेटा प्लान्सची धूम उडवून देऊन मोठी क्रांती केली होती. त्याचबरोबर त्यांनी बाजारात आणले स्वस्तातले जिओ फोन (Jio Phone). कमी दरात फोन आणि डेटाही उपलब्ध करून रिलायन्स जिओने टेलिफोन सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्याच्या जीवावर आज रिलायन्स जिओ कंपनी सेवा देण्याच्या बाबतीत जगातली नववी दूरसंचार कंपनी ठरली आहे.   
 

आता जिओ कंपनीने स्वस्तातला आणि विद्यार्थी किंवा शैक्षणिक संस्था सहज वापरू शकतील असा जिओबुक लॅपटॉप सर्वसामान्यांसाठी बाजारात आणला आहे. आणि त्याची किंमत आहे 19,950 रुपये. विविध सवलतींनंतर रिलायन्स डिजिटलच्या वेबसाईटवर तो 15,799 रुपयांत उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने तो लाँच केला होता. पण, तेव्हा शैक्षणिक संस्था किंवा क्लासेस साठी मुख्यत: त्यांनी तो उपलब्ध केला होता. याशिवाय सरकारी कंपन्यांसाठीही त्यांनी तो देऊ केला होता. नोंदणीनंतर सात ते दहा दिवसांनी तो मिळत होता.    

आता पुन्हा एकदा जिओबुक रिलायन्स डिजिटलच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. आणि त्याची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.    

जिओबुकचे फिचर्स Jio Book Features  

जिओबुकचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. प्लास्टिक बॉडी आणि काही ठिकाणी धातुचा वापर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे जिओओएस या कंपनीने बनवलेल्या ऑपरेटिंग प्रणालीवर तो चालतो.    

जिओबुकमध्ये 2GB रॅम आहे. तर स्टोरेज 32 GBचं आहे. हे हार्ड डिस्क स्टोरेज वाढवता येणार नाही.    

लॅपटॉपचा डिस्प्लेचा दर्जा चांगला आहे. आणि 11.6 इंचांचा HD डिस्प्ले लॅपटॉपला देण्यात आला आहे. त्याला दोन USB तर एक HDMI पोर्टही देण्यात आलाय. याशिवाय मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही आहे.    

सुरुवातीला लाँच केलेल्या लॅपटॉपमध्ये WiFi सुविधा जोडण्याची सोय नव्हती. पण, आता कंपनीने त्यात सुधारणा केली आहे. वाय-फायच्या बरोबरीने ब्लूटूथ जोडणीची सुविधा या लॅपटॉपमध्ये आहे. तसंच 4G नेटवर्कशी तो जोडता येऊ शकतो. यात इन-बिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोनही आहेत.    

या लॅपटॉपचं वजन 1.2 किलो आहे. आणि रिलायन्स जिओनं एका वर्षाची गॅरंटी या लॅपटॉपसाठी देऊ केली आहे.    

रिलायन्स जिओचा ताबा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीकडे आल्यानंतर कंपनीने घेतलेला हा सगळ्यात मोठा निर्णय आणि लाँच आहे. रिलायन्स जिओ फोन प्रमाणे हा लॅपटॉपही एंट्री-लेव्हल म्हणजे सगळ्यात कमी क्षमता आणि किंमत असलेला लॅपटॉप आहे. त्याची बहुतेक विक्री ही रिलायन्स डिजिटल शोरुममध्ये किंवा ऑनलाईन सुरू आहे. तो सगळीकडे उपलब्ध नाही.