फाउंडइटनं (Foundit) जॉबच्या संदर्भातला एक रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात नवीन नियुक्त्या म्हणजेच नवीन नोकरभरतीत (New recruitment) सुमारे 7 टक्क्यांनी घट झाल्याचं समोर आलं आहे. फाउंडइट हे एक टॅलेंट प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून आशिया आणि मध्य पूर्वेतल्या अनेक भागांमध्ये काम केलं जातं. बिझनेस स्टँडर्डमध्ये यासंदर्भातला अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन नोकऱ्यांमध्ये 7 टक्क्यांनी घट झाली आहे. असं असलं तरी छोट्या शहरांमध्ये मात्र नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. अहमदाबाद, जयपूर यांसारख्या देशातल्या टायर-2 शहरांमध्ये नवीन नोकरभरतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
Table of contents [Show]
काय कारणं?
देशातल्या उद्योगांमध्ये महिन्यानुसार 4 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. या घसरणीमागचं प्रमुख कारण म्हणजे आर्थिक मंदी आहे. जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे देशातल्या अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. यासोबतच आपला खर्च कमी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी नवीन नोकरभरतीची प्रक्रिया काही कालावधीसाठी कमी केली आहे किंवा थांबवली आहे. अशा परिस्थितीत देशातल्या नव्या नोकरभरतीच्या आकडेवारीवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
कोणत्या क्षेत्रात वाढ?
मागच्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात नोकरभरतीत घट झाली आहे. मात्र असं असलं तरी काही क्षेत्रांमध्ये नवीन नोकरभरतीत वाढ झाल्याचं दिसतंय. एकूण 13 क्षेत्रांचा विचार केल्यानंतर ही बाब ठळकपणे दिसून येईल. एचआर, अॅडमिन हे तीन क्षेत्रांपैकी एक आहे. याठिकाणी मे महिन्यात एकूण 8 टक्के भरतीची वाढ नोंदवण्यात आली आहे. यासोबत विक्री आणि व्यवसाय विकास त्याचप्रमाणे प्रवास आणि पर्यटन या क्षेत्रतही नव्या भरतीमध्ये वाढ नोंदवण्यात आल्याचं दिसतं. सागरी उद्योगात मागच्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्के वाढ झाली आहे.
कुठे कमी झाल्या नोकऱ्या?
बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठी मे महिना फारसा चांगला राहिला नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत या क्षेत्रातल्या एकूण नोकरभरतीत 10 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतली मंदी, वाढती महागाई, वाढलेले व्याजदर आणि पुरवठा साखळीतला व्यत्यय यामुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित झाल्याचं आढळून आलं आहे.
कमी नोकरभरती झालेली शहरं?
बेंगळुरूसारख्या शहरात नोकरभरतीत जवळपास 24 टक्क्यांची मोठी घट झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. चंदीगड, कोलकाता, बडोदा आणि कोची याठिकाणी नोकरभरतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालंय. मागच्या वर्षीच्या तुलनेत बडोदा या शहरात 7 टक्के, कोईम्बतूर आणि कोचीमध्ये 2 टक्क्यांनी नव्या नोकरभरतीत घट झाली आहे. कोलकातामध्ये हा आकडा जवळपास 16 टक्के इतका आहे.
नोकऱ्या जाण्याचं प्रमाणही अधिक
नवीन नोकरभरतीत घट तर झाली आहेच. मात्र त्याशिवाय आहे त्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाणही अधिक आहे. भारतात विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवत असल्याचं दिसतंय. मोठ्या कंपन्यांसह विविध स्टार्टअप्समध्येही हाच ट्रेंड सुरू आहे. फ्रेशर्सना मात्र सहज जॉब मिळत असल्याचं मात्र प्रकर्षानं दिसून येतंय.