Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवीन बँक खाते सुरु करण्याआधी जाणून घ्या हे सारे मुद्दे!

नवीन बँक खाते सुरु करण्याआधी जाणून घ्या हे सारे मुद्दे!

लहानपणापासून आपण आपल्या पहिल्या आठवणीच्या वस्तू, पहिली खरेदी याबाबतीत जसे जागृत असतो. तसेच आपण जेव्हा बँकेत खाते सुरू करतो तेव्हा काय काळजी घ्यायला हवी? पाहणार आहोत.

बर्‍याचदा आपण बँकेत खाती उघडतो आणि ते पूर्णपणे विसरतो. बहुधा ही बँक खाती आपल्या पालकांनी आपल्या लहानपणी किंवा आपल्या पहिल्या पगारासाठी आपल्या कंपनीने सुरु करुन दिलेली असतात. काही काळाने जर आपण नोकरी बदलली तर आपले ते खाते आपोआप निष्क्रिय होते आणि नवीन खाते सुरु करण्यात येते. अशा खात्यांमधे जर काही व्यवहार होणार नसतील तर ते वेळीच बंद करणं  फायद्याचे ठरेल . नाहीतर त्यावर काही दंड बँकेकडून आकारला जाऊ शकतो आणि काही कालावधीनंतर ते खाते बँकेकडून बंद केले जाऊ शकते आणि त्या खात्यात असलेले पैसे तुम्ही गमावू शकता. 

बँका हे पैसे ठेवण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि भरपूर पैसे घेऊन जाणे टाळण्यासाठी डेबिट कार्ड एक वरदान आहे आणि त्यामुळे बचत देखील होते. बँकांचे  नियम आहेत जे त्यांचे स्वतःचे तसेच ग्राहकांचे हित जपण्यासाठी लागू केले आहेत. जर ग्राहकाने कोणतेही नियम तोडले तर त्यांना दंड आकारला जातो.    

नॉन-बँक एटीएम मशिन्स अधिक वारंवार वापरणे          

RBI (रिझर्व बॅंक ऑफ इंडिया)च्या नियमांनुसार, ज्या बँकेत तुमचे खाते नसेल त्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला जास्तीत जास्त पाच व्यवहार करण्याची परवानगी आहे. तुम्ही हा आकडा ओलांडल्यास, तुम्हाला त्यासाठी फी भरावी लागते. रोख रक्कम काढणे,  शिल्लक तपासणे आणि ATM पिन बदलणे अशा व्यवहारांसाठीही फी आकारली जाते. यापूर्वी हा नियम फक्त पैसे काढण्यासाठीच लागू होता.           

बँकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे          

बहुतेक बँका त्रैमासिक खाते स्टेटमेंट, ओव्हरड्राफ्ट सूचना आणि इतर पत्रव्यवहार पाठवतात. आता त्याबद्दल ई-मेल पाठवण्यात येतात. डुप्लिकेट स्टेटमेंट जारी करण्यासाठी बँका शुल्क आकारतात आणि हे फोनवरून करता येत असले तरी ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. अर्थात, जे ऑनलाइन बँकिंग वापरतात, ते खात्याच्या स्टेटमेंटचे प्रिंट घेऊ शकतात. पण बँकेकडून येणारे ईमेल्स दुर्लक्ष न करता वाचावेत. 


वैयक्तिक तपशील आणि माहितीमधील कोणताही बदल     

पत्ता आणि फोन नंबर यासारखी वैयक्तिक माहिती अपडेट करणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. कारण नवीन पत्ता संबंधित पुराव्यासह आणि बँकेच्या शाखेत अर्जासह द्यावा  लागतो. काही बँका ही सुविधा ऑनलाइनही देतात. काही ग्राहकांना ATM मधून त्यांचे फोन नंबर बदलण्याची परवानगी आहे. पण सरकारी बँका किंवा काही सहकारी बँका अशा सुविधा देत नाहीत. अशा प्रकरणात विलंब झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण तुमचा बँकेशी पत्रव्यवहार चुकू शकतो आणि तुमची माहिती चुकीच्या लोकांच्या हातात पडू शकते. परिणामी गोपनीयतेचा भंग किंवा फसवणूक होऊ शकते.     

चेक क्लियरन्स किंवा चेक बाऊन्स होणे         

ग्राहकाने दिलेला चेक बाऊन्स झाला तर बँकेकडून दंड आकारला जातो. धनादेशाच्या बाऊन्स होण्याच्या कारणावर दंड अवलंबून असतो. अपुर्‍या रकमेमुळे चेक बाऊन्स झाल्यास दंड जास्त आहे आणि जर तिसर्‍या व्यक्तीने ग्राहकाच्या नावाने चेक जारी केला असेल. पण अपुऱ्या निधीमुळे तो बाऊन्स झाला असेल, तर ग्राहकावर कमी दंड आकारला जातो. दंडाची रक्कम रु. 50 पासून रु. 750 पर्यंत असू शकते. अनेक प्रकरणांमध्ये चेक बाऊंस झाल्याची तक्रार नोंदवून त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि त्यात कारावासाच्या शिक्षेचा समावेश होऊ शकतो. म्हणून नेहमी बँकेतील शिल्लक रक्कम तपासूनत चेक देण्याचा सल्ला दिला जातो.          

स्टॉप पेमेंट          

जर तुम्ही कोणाला दिलेल्या चेकच्या विरूद्ध पेमेंट थांबविण्याची विनंती केली तर बँक काही प्रमाणात फी आकारू शकते.  काही बँका ऑनलाइन विनंत्यांच्या बाबतीत असे शुल्क आकारत नाहीत. पण बॅंकेच्या शाखेत गेल्यास तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. ह्या शुल्काच्या रुपाने थोडी रक्कम तुमच्या खात्यातून वजा होवू शकते.          

खाते बंद करणे          

अनेक बँकांमधे बँक खाते उघडल्यानंतर सहा महिने ते एक वर्षाच्या आत बंद केल्यास खाते बंद करण्यासाठी शुल्क आकारले जाते. जर एखाद्याने त्यांचे बँक खाते नीट विचार करुन काळजीपूर्वक सुरू ठेवले तर यातील बरेच चार्जेस टाळणे सोपे होते. नियमित पणे खाते तपासणे आणि खात्यामधील व्यवहार व्यवस्थित ठेवणे ह्या गोष्टी अशा प्रकारचे चार्जेस टाळण्यास मदत करू शकतात. त्यामुळे आपले बँक खाते काळजीपूर्वक वापरा आणि जास्तीत जास्त बचत करा.