RBL Bank: खाजगी क्षेत्रातील आरबीएल (RBL) बँकेने, नुकतेच डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेचा नफा 34 टक्क्यांनी वाढून 209 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत 156 कोटी रुपयांचा नफा झाला होता. डिसेंबर तिमाहीत आरबीएल बँकेचा एकूण महसूल वार्षिक 11 टक्क्यांनी वाढून 1 हजार 767 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
स्टॉकचा 6 महिन्यांचा परतावा (6 months return of stock)
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी आरबीएल (RBL) बँकेच्या शेअरची किंमत 169.90 रुपये होती. मागील दिवसाच्या तुलनेत यात 1.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 6 जानेवारी रोजी शेअरचा भाव 189 रुपयांच्या पुढे गेला होता, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. यात शेअरच्या किमतीत किंचित घट झाली आहे. तरी, समभागाने (Shares) 20 जून 2022 रोजी 74.15 च्या विक्रमी नीचांकी पातळीवरून 150 टक्के परतावा दिला आहे. 28 मे 2019 रोजी शेअरने 717 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता.
आरबीएल बँकेविषयी (About RBL Bank)
आरबीएल बँक सांगीलीमध्ये 6 ऑगस्ट 1943 साली सुरू झाली होती. या 80 वर्षे जुन्या बँकेची सुरुवात बाबगोंडा भुजगोंडा पाटील आणि गंगाप्पा सिद्धप्पा चौगुले यांनी केली होती. या बँकेचे नाव आरबीएल म्हणजे रत्नाकर बँक लिमिटेड (Ratnakar Bank Limited) असे आहे. 1970 नंतर या बँकेला हळूहळू लोकप्रियता मिळत गेली. आज या बँकेत 10 हजार कर्मचारी काम करतात. कंपनीचे नेट इन्कम 6 हजार 367 कोटी आहे तर, 2022 सालचा रेव्हेन्यू 10 हजार 516 कोटी एवढा आहे.
डिसेंबर 2022 पर्यंत बँकेच्या 516 शाखा आणि 1 हजार 168 बिझनेस करस्पॉडंट शाखा होत्या, त्यापैकी 298 बँकिंग आउटलेट आहेत. आरबीएल फिनसर्व्ह लिमिटेड (RBL FinServ Limited) ही बँकेची 100 टक्के उपकंपनी आहे, तिच्या 821 बिझनेस करस्पॉन्डंट शाखा आहेत.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)