Clean Note Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. 19 मे) 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्यांना 23 मे पासून ते 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. पण मुळात आरबीआयने हा निर्णय घेतला का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
2016 मध्ये जेव्हा जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून त्याऐवजी 2000 रुपयांची नोट आणली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 2 हजारांची नोट आणत असल्याचे सांगितले होते. पण काल आरबीआयने अचानक ही दोन हजारांची नोट क्लीन नोट पॉलिसी (Clean Note Policy - स्वच्छ चलन धोरण) अंतर्गत चलनातून काढून घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काय आहे ही क्लीन नोट पॉलिसी हे आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे क्लीन नोट पॉलिसी?
प्रत्येक देशाला आर्थिक व्यवहारासाठी चलनाची गरज भासते. ती पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना हाताळण्यासाठी ती कशी सुरक्षित ठरेल. यासाठी एक धोरण निश्चित करणे आवश्यक असते. त्या धोरणानुसार आरबीआयकडून 1988 मध्ये स्वच्छ चलन धोरण (Clean Note Policy) तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत चलनी नोटांचे आयुष्य जास्तीत जास्त कसे वाढेल. किंवा काही नोटा किती वर्षे चलनामध्ये वापरायच्या याची नियमावली तयार केली आहे. त्या नियमावली अंतर्गत 2000 रुपयांची चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्यातील कलम 27 अनुसार, कोणालाही चलनी नोटा नष्ट करण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा, त्या खराब करण्याचा अधिकार नाही. या नोटा चलनात ठेवण्याबरोबरच त्या स्वच्छ ठेवणे हे क्लीन नोट पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार सरकारने डिजिटल पेमेंटला बढावात देत नवीन क्लीन नोट पॉलिसी 1 ऑक्टोबर, 2018 पासून लागे केली होती.
2000 रुपयांच्या नोटेचे आयुष्यमान 4-5 वर्षे
आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार, दोन हजार रुपयांच्या नोटेचे आयुष्य 4-5 वर्षे होते. या नियमानुसार, दोन हजाराची नोट 2016 मध्ये चलनात आली होती. त्याला आता 2023 मध्ये 6-7 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या नोटा मागे घेण्यात येत आहेत. तशीही ही नोट 2019-20 या आर्थिक वर्षापासून छापणे बंद करण्यात आले होते.
क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत कोणत्या गोष्टी येतात?
क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत चलनी नोटांचे आयुष्य वाढण्यासाठी त्याची हाताळणी कशाप्रकारे करावी. याबाबत त्यात आरबीआयकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- नोटांवर काहीही लिहू नये.
- नोटांची खूप साऱ्या घड्या घालू नये.
- नोटेवर तेल किंवा तत्सम पदार्थ सांडू नये.
- हळद, कुंकू, भंडारा किंवा इतर रंगांपासून नोट सुरक्षित ठेवावी.
- नोटांना स्टॅपलर पीन लावू नये.
- नोटांना स्टॅपलर करण्याऐवजी त्यांना रबर बॅण्ड लावावा.
- चलनी नोटांचा वापर हार म्हणून करू नये.
- चलनी नोटांचा वापर खेळण्यामध्ये करू नये.
- जीर्ण व खराब झालेल्या नोटा बँकेतून बदलून घ्याव्यात.
- फाटक्या नोटा चिटकवून वापरू नये.
बनावट चलनी नोटा ओळखणे हा सुद्धा क्लीन नोट पॉलिसीचा भाग आहे. याबाबत आरबीआयने वेबसाईटवर बनावट चलनी नोटा आणि खऱ्या नोटा कशा ओळखायच्या याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वसामान्य नागरिक बनावट नोटा ओळखून त्या चलनातून बाद करण्यास मदत करू शकतात.