Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआय समितीनेही व्यक्त केली दुधाच्या वाढत्या दराबाबत चिंता, मे महिन्यात दूधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ

Milk Price Hike

Milk Price Hike: वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. देशात अनेक ठिकाणी दिवसाची सुरुवात ही दुग्धजन्य पदार्थांनी होते, यामुळे दूधाची भाववाढ लक्षात घेता जनसमान्यांच्या खिशाला झळ पोहोचली आहे. दूध महाग झाल्याने दूधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ देखील महाग झाले आहे.

Milk Price Hike In May: किरकोळ महागाई आणि अन्नधान्य विषयक महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे. परंतु, दुधाच्या भाववाढीतून लोकांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांचे दर कमी झाले असले तरी, मात्र दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. मे महिन्यासाठी जाहीर केलेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या महागाई दरात वाढ झाली आहे.  

एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात वाढ

दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दर एप्रिल महिन्यात ८.८५ टक्के होता.
मे महिन्यात हा दर ८.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या वर्षी मे 2022 मध्ये दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दर 5.64 टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाच्या या आकडेवारीवरून, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते.

आरबीआयने केली चिंता व्यक्त

RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 6 ते 8 जून 2023 या तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली होती. 8 जून रोजी जारी केलेल्या ठरावातही आरबीआय समितीने दुधाच्या दराबाबत चिंता व्यक्त केली होती. आरबीआयच्या एमपीसीने सांगितले की, पुरवठ्यातील कमतरता आणि चाऱ्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे दुधाच्या किमती वाढत राहतील. म्हणजेच किरकोळ महागाईचा दर कमी होत असला तरी खुद्द आरबीआयही दुधाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दीड वर्षात दर प्रचंड वाढले

दुधाची महागाई पाहिल्यास, ३० जून २०२१ रोजी अमूल फ्रेशचा दोन लिटर पॅक ८८ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होता, आता तो १०८ रुपयांचा झाला आहे, म्हणजे 20 रुपयांनी महाग झाला आहे. अमूलचे म्हशीचे दूध,जे 30 जून 2021 रोजी 59 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते, ते 19 टक्क्यांनी महागले असून ते 70 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. अमूलचे गायीचे दूध पहिले दीड वर्ष ४७ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते, ते आता ५६ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे, म्हणजे सुमारे 20 टक्के महाग झाले आहे. गेल्या दीड वर्षात मदर डेअरी आणि अमूलने दुधाच्या दरात पाच वेळा वाढ केली आहे.  

दुग्धजन्य पदार्थात वाढ

किरकोळ महागाईचे आकडे सांगत आहेत की, दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे दूध महागल्याने दही, लस्सी, तूप, पनीर, खवा, ताक यांच्या दरात वाढ झाली आहे. मदर डेअरीने ताकाच्या पॅकेजचा आकार कमी केला आहे. दूध महागल्याने मिठाई आणि आईस्क्रीमही महाग झाले आहेत. बिस्किटे आणि चॉकलेट बनवणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांनीही त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, पुरवठ्यातील तुटवड्यामुळे दुधाच्या किमतीवरील वाढीचा दबाव कायम राहील, याचा अर्थ दुधापासून बनवलेल्या महाग उत्पादनांचा ट्रेंड कायम राहणार आहे.

सामान्य कुटुंबाला झळ

दुधाच्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. हा पौष्टिक आहार लहान मुले आणि वृद्धांसाठी महाग झाल्यानंतर लोकांनी दुधाचे सेवन कमी केले आहे. अलीकडेच एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, दर 10 कुटुंबांपैकी 4 कुटुंबे अशी आहेत ज्यांनी दुधाचे सेवन कमी केले आहे. अमूल फ्रेशच्या एक लिटर दुधाच्या पॅकेट करीता जिथे ग्राहकांना महिन्याचा 1300 ते 1350 रुपयांच्या जवळपास खर्च येत होता. तिथे आता ग्राहकांना 1650 ते 1700 रुपये मोजावे लागणार आहे.