रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी पतधोरण जाहीर केले. यात रेपो दर 0.25% ने वाढवण्यात आला असून तो 6.50% इतका केला आहे. सलग सहाव्यांदा आरबीआयने पतधोरणात व्याजदर वाढवून कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यातील पतधोरणात बँकेने व्याजदरात 0.35% ची वाढ केली होती. (RBI Monetary Policy 2023 Outcomes today )
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी पतधोरण जाहीर केले. यात पतधोरण समितील बहुतांश सदस्यांनी व्याजदरात 0.25% वाढ करण्याच्या बाजूने कौल दिल्याचे दास यांनी सांगितले. ते म्हणाले की रेपो दरात 0.25% वाढ करुन तो 6.50% करण्यात आला आहे. चालू वर्षात बँकेने आतापर्यंत 2.50% व्याजदर वाढवला आहे.
चालू आर्थिक वर्षात सहा वेळा पतधोरणात व्याजदर वाढवला आहे. यामुळे एकूण रेपो दरात 2.50% वाढ झाली. रेपो वाढवल्याने बँकांनी देखील कर्जाचे दर वाढवले. मागील सहा महिन्यात होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजदरात मोठी वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणाची ठळक वैशिष्ट्ये
- रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात 0.25% ची वाढ, रेपो दर आता 6.50% इतका असेल. याशिवाय बँकांसाठीची स्टॅंडिंग डिपॉझिट फॅसिलीटीचा दर 6.25% करण्यात आला आहे. त्यात 0.25% वाढ करण्यात आली.
- पतधोरण समितीतील 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो दर वाढीच्या बाजूने कौल दिला.
- पतधोरण समितीने महागाई नियंत्रणाला प्राथमिकता दिली.
- आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जीडीपी दर 6.4% इतका राहील.
- आर्थिक वर्ष 2023 मध्ये महागाई दर 6.5% इतका राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
- चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत चालू खात्यातील तूट कमी होईल. चालू वर्षासाठी ही तूट 3.3% इतकी असेल
-सरकारी रोख्यांचा बाजार आता पूर्वीप्रमाणे सकाळी 9 ते 5 या वेळेसाठी खुला राहण्याचा निर्णय घेतला.
- जी 20 देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना यूपीआय सेवा वापरता येणार
- क्यूआर कोड आधारित कॉइन वेंडिंग मशीन 12 शहरात प्रायोगिक तत्वावर सुरु करणार