रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मॉनेटरी पॉलिसी समितीची (पतधोरण समिती) तीन दिवसीय बैठक सोमवारपासून (दि.5 डिसेंबर) सुरू झाली. ही बैठक 7 डिसेंबरला संपणार (RBI MPC Meeting Dates 2022) असून, या बैठकीनंतर पतधोरण समिती (MPC) रेपो दरामध्ये (Repo Rate) पुन्हा एकदा दरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसबीआयच्या इकोरॅप (Ecowrap) या रिसर्च रिपोर्टमध्ये एमपीसी अंदाजे 35 बेसिस पॉईंटने रेपो दरात वाढ करेल, असे म्हटले.
Table of contents [Show]
पुन्हा एकदा रेपो दर वाढणार?
मॉनेटरी पॉलिसी समिती महागाई दर (Inflation Rate) आटोक्यात आणण्यासाठी रेपो दरामध्ये (Repo Rate) वाढ करण्याची शक्यता आहे. कारण आरबीआयने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा महागाईचा दर 6 टक्क्यांच्या वरच आहे. दरम्यान यापूर्वी आरबीआयने म्हणजे 2022 या आर्थिक वर्षांत एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरामध्ये 190 बेसिस पॉईंटने वाढ केली. सध्या आरबीआयचा रेपो दर (Repo Rate) 5.90 टक्के आहे. त्यामुळे मॉनेटरी पॉलिसी समिती महागाई आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा दरवाढ करू शकते.
रेपो दरात 35 बेसिस पॉईंटने वाढ होण्याची शक्यता!
सध्या आरबीआयचा रेपो दर 5.90 टक्के असून यात 35 बेसिस पॉईंटची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 डिसेंबरला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das, RBI Governor) यांच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर रेपो रेट 6.25 टक्के होईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. महागाई दर 6 टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात आरबीआयला अपयश येत आहे. ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाई दर 6.77 टक्के होता. त्याच्या अगोदरच्या महिन्यात हा दर 7.41 टक्के होता.
कर्ज सुद्धा महागणार?
आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, सार्वजनिक आणि खासगी बॅंका कर्जाच्या व्याजदरातही वाढ करण्याची शक्यता आहे. परिणामी, होम लोन, कार लोन आणि इतर प्रकारची लोन्स महाग होऊ शकतात. तसेच ज्यांचे पूर्वीपासून लोन सुरू आहे; त्यांचा ईएमआय वाढू शकतो किंवा लोन कालावधी वाढू शकतो.
पुढील बैठक 6 ते 8 फेब्रुवारी, 2023
पतधोरण समितीची प्रत्येक दोन महिन्यांनी म्हणजे एका आर्थिक वर्षात किमान 6 वेळा बैठक होते. 2022 या आर्थिक वर्षातील ही पाचवी बैठक सध्या सुरू असून पुढील आणि 2023 या आर्थिक वर्षातील शेवटची बैठक 6 ते 8 फेब्रुवारी, 2023 यादरम्यान (RBI MPC Next Meeting Dates) होईल.