L&T Finance: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एल अँड टी फायनान्सला अडीच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. नॉन बँकिंग फायनान्स (NBFC) कंपन्यांसाठीचे नियम न पाळल्यामुळे कंपनीला हा दंड करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून एल अँड टी च्या कारभाराची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये कंपनी दोषी आढळून आल्याने कारवाई झाली.
कोणत्या नियमांचे उल्लंघन?
बिगर वित्त कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियम कक्षेत येतात. या कंपन्यांनी आरबीआयच्या सर्व नियमांचे पालन करणे अपेक्षित आहेत. कंपन्यांच्या कारभाराचे आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी तपासणीही होत असते. कंपनीच्या अहवालामध्ये कारभारासंबंधी सर्व माहिती असते. मात्र, एल अँड टी फायनान्सने अहवलात काही माहिती लपवल्याचे आरबीआयला आढळून आले.
किरकोळ कर्जदारांना ठेवलं अंधारात
एल अँड टी फायनान्सने किरकोळ कर्जदार आणि त्यांना दिलेल्या कर्जावरील व्याजाची माहिती अहवलात लपवली होती. कोणत्या श्रेणीतील कर्जरादारांना किती कर्ज दिले? कर्जासाठी किती व्याजदर आकारला? व्याजदरातील बदलाची माहिती कंपनीच्या अहवालात नव्हती. ठराविक व्याजदर का आकारला याची माहितीही उपलब्ध नसल्याचे तपासणीत उघड झाले.
तसेच व्याजदरातील बदल कर्जदारांना सूचित करण्यासही कंपनी अपयशी ठरली. कर्जदारांना ठरवलेल्या व्याजदारापेक्षा जास्त व्याजदर आकारल्याचे सूचित करणं अनिवार्य आहे, मात्र, एल अँड टी फायनान्सने या नियमाचे पालन केले नाही. आरबीआयने एल अँड टी फायनान्सला याविषयी अधिक माहिती मागीतली होती. कंपनीने ती जमाही केली. त्यानंतरही आरबीआयचे समाधान न झाल्याने दंडात्मक कारवाई केली.