बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने 4 बँकांवर कारवाई केली आहे. यात तामिळनाडू स्टेट अपेक्स को ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँक, जनता सहकारी बँक आणि बारण नागरिक सहकारी बँक या चा बँकांना एकूण 44 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.
तामिळनाडू स्टेट अपेक्स को ऑपरेटिव्ह बँकेला 16 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेने याशिवाय बॉम्बे मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँक आणि जनता सहकारी बँक या दोन बँकांना प्रत्येकी 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.राजस्थानमधील बारण नागरिक सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.
तामिळनाडू स्टेट अपेक्स को ऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बॉम्बे मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँकेने डिपॉझिटर एज्युकेशन आणि अवेरनेस फंडात पैसे योग्यवेळी ट्रान्सफर न केल्याने रिझर्व्ह बँकेने कारवाई केली. पुण्याती जनता सहकारी बँकेला ठेवीदाराला व्याज न देणे महागात पडले आहे. ठेवींवर व्याजासंदर्भातील नियमावलीचे उल्लंघन केल्याने आरबीआयने जनता सहकारी बँकेवर कारवाई केली.
यापूर्वी आरबीआयने कर्नाटक स्टेट को ऑपरेटिव्ह अपेक्स बॅंकेला केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 लाखांचा दंड ठोठावला होता. खासगी वित्त सेवा पुरवठादार महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसला केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6.77 कोटींचा दंड ठोठावला होता. दक्षिण भारतातील करुर वैश्य बॅंकेला फायनान्शिअल फ्रॉडची माहिती दडवल्याप्रकरणी कारवाई केली होती. रिझर्व्ह बँकेने केलेल्या परिक्षणात करुर वैश्य बँकेची कुचराई आढळून आली. त्यावर रिझर्व्ह बँकेने 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.