रिझर्व्ह बँकेने देशातील आणखी दोन सहकारी बँकांवर गदा आणली आहे. बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार आर्थिक व्यवहारातील अनियमितता आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे. यात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कार्यरत असलेल्या दोन सहकारी बँकांचे बँक परवाने रद्द करण्यात आले आहेत.
आरबीआयने म्हटले आहे की त्यांनी बुलढाणास्थित ‘मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ आणि बेंगळुरूस्थित ‘सुश्रुती सौहर्दा सहकारी बँक’ या दोन सहकारी बँकांचे बँकिंग परवाने रद्द केले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात देशभरातील वेगवगेळ्या 8 सहकारी बँकांवर आरबीआयने कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर आता या दोन बँकांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
आरबीआयच्या निवेदनानुसार, कारवाईची घोषणा झाल्यानंतर या दोन्ही सहकारी बँका बँकेशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाहीत.या सहकारी बँकांकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
आरबीआयचे लक्ष
गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही बँकांच्या आर्थिक व्यवहारावर आरबीआय लक्ष ठेऊन होती. याआधी देखील या बँकांना व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यास आणि पुरेसे भांडवल उभे करण्यास सांगितले गेले होते. अनकेदा सहकारी बँका या राजकारणी मंडळींकडून चालवल्या जातात. त्यामुळे आरबीआयच्या नियमांना बँकांचे संचालक मंडळ गांभीर्याने घेताना दिसत नाही. अशात सर्वसामान्य खातेदारांचा पैसा बुडण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी आरबीआय आपल्या अधिकारांचा वापर करत बँकांवर कारवाई करू शकते, दंड आकारू शकते किंवा थेट बँकांचे लायसन्स देखील रद्द करू शकते.