Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Line on UPI: आता बँकेकडून यूपीआय अ‍ॅपवरच मिळणार कर्ज, जाणून घ्या याचे फायदे-तोटे

UPI Loan

Image Source : https://www.moneycontrol.com/

आरबीआयने यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला मंजूरी दिली आहे. याद्वारे आता यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.

गेल्याकाही वर्षात यूपीआय अ‍ॅपचा वापर प्रचंड वाढला आहे. यूपीआयवरून होणाऱ्या व्यवहारांचा आकडा हा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. स्मार्टफोन-इंटरनेटची उपलब्धता व वापरण्यास सहज सोपे असल्याने यूपीआय लोकप्रिय ठरले आहे. आतापर्यंत या माध्यमातून केवळ बँक खात्यात असलेल्या पैशांचाच व्यवहार करता येत असे. थोडक्यात, तुम्ही बँक खात्यात जमा असलेले पैसेच इतरांना पाठवू शकत होता. मात्र, आता  यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला आरबीआयने मंजूरी  दिली आहे. म्हणजेच यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.  

कसे काम करेल UPI Pre-approved loan?  

याआधी केवळ बचत खाते, क्रेडिट कार्ड, ओव्हरड्राफ्ट अकाउंट आणि प्रीपेड वॉलेट्स यूपीआयशी लिंक करता येत असे. मात्र, आता  आरबीआयच्या परवानगीनंतर यूजर्सला कर्जाची रक्कम यूपीआय अ‍ॅपमध्ये उपलब्ध होईल व याचा वापर व्यवहारासाठी करता येईल.  

यासाठी खातेधारकांद्वारे आधीच बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर तुमच्या खात्याची माहिती तपासून बँकेकडून यूपीआयच्या माध्यमातून प्री-क्रेडिट अप्रूव्हड लाइन उपलब्ध केली जाईल, ज्याचा वापर तुम्ही करू शकता. ही प्रक्रिया काहीशी बँकेकडून कर्ज घेण्यासारखीच आहे. मात्र, यावरील व्याजदर जास्त असेल. आरबीआयद्वारे यूपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी या प्रक्रियेला परवानगी देण्यात आली आहे.  

यूपीआय प्री-अप्रूव्ह्ड कर्जाचे फायदे  

कर्जाची सहज उपलब्ध – आरबीआयने दिलेल्या या नवीन मंजूरीमुळे सर्वांना कर्ज सहज उपलब्ध होण्यास मदत होईल. याचा फायदा बँकेसह ग्राहक व व्यवसायांना देखील होईल. शेवटच्या घटकांपर्यंत सहज व पारदर्शकपणे कर्ज उपलब्ध केले जाईल.  

कर्जाची सोपी प्रक्रिया – आज बहुतांश व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून होतात. यामुळे खातेदार कशाप्रकारे व किती मर्यादेपर्यंत आर्थिक व्यवहार करत आहे, याची आकडेवारी अगदी सहज बँकेला मिळते. याचा फायदा खातेदारकांना कमी रक्कमेचे कर्ज उपलब्ध करून देण्यास होईल. सोबतच, खातेदारकांना कर्जाच्या रक्कमेसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.  

ठराविक रक्कमेवरच व्याज – नियमित कर्जामध्ये संपूर्ण रक्कमेवर व्याज आकारले जाते. मात्र, या प्रक्रियेमध्ये तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून जेवढ्या कर्जाच्या रक्कमेचा व्यवहार कराल त्यावरच व्याज भरावे लागेल. यामुळे ग्राहक अतिरिक्त भूर्दंडापासून वाचू शकतील.  

यूपीआय प्री-अप्रूव्ह्ड कर्जाचे तोटे –  

जास्त व्याजदर – ही प्रक्रिया नियमित कर्जाप्रमाणेच वाटत असले तरी बँकेकडून यावर जास्त व्याजदर आकारले जाऊ शकते. यामुळे दीर्घकालावधीसाठी अशाप्रकारचे कर्ज घेणे शक्य होणार नाही.  

पैशांची उधळपट्टी – यूपीआयचा वापर सुरू झाल्यापासून अगदी 5 रुपयांच्या वस्तूसाठी देखील डिजिटल माध्यमातून पैसे दिले जातात. ही निश्चितच चांगली बाबत आहे. परंतु, यूपीआयमुळे गरज नसतानाही पैशांची उधळपट्टी होत असल्याची तक्रार अनेकांकडून केली जाते. अशाप्रकारे, यूपीआय अ‍ॅपवर प्री-अप्रूव्ह्ड कर्ज उपलब्ध झाल्यास अतिरिक्त खर्चाची शक्यता निर्माण होते.  

कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता – अशाप्रकारचे कर्ज तुमच्या पूर्व मंजूरीनेच उपलब्ध होणार असले तरीही खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा अशाप्रकारचे कर्ज परत करण्यास अडचणी येतात.  

क्रेडिट स्कोरवर परिणाम -  खात्यात पैसे असल्यास अनावश्यक खर्च झाल्याची तक्रार अनेकजण करतात. त्यामुळे तुम्ही घेतलेले कर्ज न फेडल्यास समस्या निर्माण होऊ शकते. याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर देखील होते.