गेल्याकाही दिवसांपासून पेटीएमला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँक (PPBL) अडचणीत सापडली आहे. नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, भारतीय डिजिटल पेमेंट इंडस्ट्रीबाबत संसदीय चौकशी देखील करण्यात आली. याचा परिणाम कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर देखील पडला आहे.
Table of contents [Show]
RBI चे कठोर निर्बंध
RBI ने PPBL वर कठोर निर्बंध लादले आहे. सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेला नवीन ग्राहक जोडणे, क्रेडिट सुविधा, निधी हस्तांतरण व पैसे जमा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कंपनीचे ऑडिट केल्यानंतर अनियमितता समोर आली होती, त्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले. या निर्बंधांमुळे PayTM च्या EBITDA ला 300 ते 500 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण
आरबीआयच्या निर्बंधानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे. आरबीआयने कारवाई केल्यानंतर स्टॉक्सची किंमत तब्बल 20 टक्क्यांनी घसरली होती व यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या भविष्याबाबत आणि नियमांचे पालन करण्याच्या क्षमतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अनिश्चित भविष्य
आरबीआयच्या कारवाईनंतर PayTM ने निवेदन जारी करत प्रमुख सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ग्राहकांना आश्वासन दिले आहे. ग्राहकांच्या ठेवीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, आरबीआयच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, असे असतानाही कंपनीच्या भविष्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.
कंपनीला समस्या दूर करून नियमकांचे पालन करणे, संसदीय चौकशीला उत्तर देणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. यावरूनच कंपनीचे भविष्यात काय होणार हे अवलंबून असेल.
संसदीय चौकशी
एकीकडे आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली असतानाच, संसदीय समितीने भारतीय डिजिटल पेमेंट इंडस्ट्रीची चौकशी सुरू केली. या चौकशीत डेटा गोपनीयता, ग्राहकांचे संरक्षण व अयोग्य व्यवसाय पद्धतीसह इतर गोष्टींची चौकशी केली जाईल.
या चौकशीत पेटीएमचे थेट नाव घेण्यात आले नसले तरीही यामुळे त्यांच्या सेवा आणि भविष्यातील मार्गावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संसदीय पॅनेलच्या डिजिटल पेमेंट्सबाबतच्या रिपोर्टमध्ये यूपीआय बाजारात Google Pay आणि PhonePe सारख्या परदेशी-मालकीच्या ॲप्सच्या वर्चस्वाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये Google Pay आणि PhonePe चा वाटा तब्बल 83 टक्के असल्याचे आढळून आले व यामुळे स्पर्धा आणि मक्तेदारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर स्वदेशी BHIM UPI चा वाटा फक्त 22 टक्के आहे. त्यामुळे स्वदेशी यूपीआय ॲप्सची वाढीसाठी प्रयत्न केला जावा, असे अधोरेखित करण्यात आले. याशिवाय, परदेशी मालकीच्या ॲप्सच्या नियमनाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.