स्पाईसजेट विमान (SpiceJet Airlines) कंपनीच्या यंत्रणेवर मंगळवारी दि. 24 मे रोजी रॅन्समवेअर (ransomware) सायबर हल्ला झाला. यामुळे कंपनीच्या विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला. बुधवारी सकाळी दि. 25 मे रोजी काही विमानांचे उड्डाण उशिराने झाले. याबाबत स्पाईसजेट कंपनीच्या अधिकृत खात्यावरून ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
ट्विटरवरील खात्यावरून दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, "स्पाईसजेटच्या सिस्टिमला मंगळवारी रात्री रॅन्समवेअर हल्ल्याचा (ransomware attack) सामना करावा लागला. त्यामुळे बुधवारी सकाळी विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. आमच्या टेक्निकल टीमने परिस्थिती आटोक्यात आणून ती पूर्ववत सुरू केली आहे. आता विमानांचे उड्डाण व्यवस्थितरीत्या सुरू आहे."
दरम्यान विमानतळावर उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, ते विमानतळावरच थांबले होते पण विमान कंपनीकडून कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे प्रवासी विमानात अडकले होते. विमानकंपनीच्या यंत्रणेवर रात्री सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण सकाळी 5 वाजल्यापासून विलंब कशामुळे होत आहे किंवा सेवा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल, अशी कोणतीही सूचना विमानतळावर दिली जात नव्हती. दरम्यान, काही प्रवाशांनी, शेकडो स्पाईसजेट प्रवाशी तासनतास अडकून पडल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. स्पाईसजेट विमान कंपनीकडे 91 विमाने आहेत; त्यापैकी 13 मॅक्स आणि 46 बोईंग 737 प्रकारची विमाने आहेत.
काय असतं रॅन्समवेअर?
तुमच्या कॉम्प्युटरवरील किंवा लॅपटॉपवरील तुमचीच महत्त्वाची माहिती तुम्हाला वापरू न देणं आणि ती वापरायची असेल तर त्यासाठी खंडणी मागायची, याकरीता वापरल्या जाणाऱ्या व्हायरसला ‘रॅन्समवेअर’ म्हणतात. हे व्हायरस तुमचा कॉम्प्युटर हॅक करून त्याच्यातील माहिती एनक्रिप्ट करतात.
रॅन्समवेअर सारख्या व्हायरसपासून तुमच्या कॉम्प्युटरचे किंवा लॅपटॉपचे संरक्षण करण्यासाठी त्यात एक चांगला अॅण्टीव्हायरस असणे आवश्यक आहे. तसेच तो अॅण्टीव्हायरस वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. इंटरनेटवर सर्फिंग करताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कोणत्याही अनोळखी वेबसाईट किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.