• 05 Feb, 2023 13:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अवघ्या 20 हजारांच्या भांडवलातून उभी केली लाखोंची कंपनी; जाणून घ्या एका यशस्वी उद्योजकाची कहाणी!

Yashaswi Udyojak Sharad Veer

Image Source : www.yashaswiudyojak.com

आजच्या यशस्वी उद्योजक या लेखात आपण एक साधा मंडप कामगार स्वत:ची कंपनी उभारून शेकडो लोकांना कसा रोजगार देतो, याची प्रेरक कहाणी जाणून घेणार आहोत.

एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटले की, त्याचा खाचाखोचा माहिती  हव्यात. नुसता तो व्यवसाय काठावर उभा राहून नाही करता येत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जय गणेश डेकोरेटर्सचे संस्थापक शरद वीर. शरद वीर यांनी 2010 मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात पदार्पण केलं. या क्षेत्रात येण्यापूर्वी ते एका इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. हे काम करत असताना यातील अनेक गोष्टीं बारकाईने समजून घेतल्या. लोकांशी ओळखी वाढवल्या आणि हळूहळू इव्हेंट मॅनेजमेंटचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसला. त्यातून या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 50 ते 60 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर एक साधा मंडप कामगार ते शेकडो लोकांना रोजगार देणाऱ्या शरद वीर यांची प्रेरक कहानी जाणून घेणार आहोत.

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नव्हते

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रोकल हे गाव सोडून शरद वीर यांचे आई-वडिल 1972 च्या दुष्काळात पुण्यात आले. शरदराव त्यावेळी अवघे 4 वर्षांचे होते. त्यांची मोठी भावंडंही लहानच होती. त्यांच्यात शरदराव सगळ्यात लहान. पुण्यात आल्यावर त्यांचे आई-वडील दोघेही बांधकामाच्या ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होते. त्यांना हातभार म्हणून शरदराव आणि त्यांचे भाऊ-बहिण त्यांना हातभार म्हणून शाळा शिकत कुठे वाळूचे ट्रक रिकामे कर, कुणाच्या विटा इमारतीवर पोहोचव अशी कामे करत होते. काम करत शिकण्याच्या सवयीमुळे शरदरावांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम झाला. दहावीच्या परीक्षेत त्यांना कमी मार्कस् मिळाले. त्यानंतर मात्र त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ड्रायव्हिंगची लाईन पकडली.

मंडप डेकोरेटर्सकडे रोजंदार म्हणून  कामास सुरूवात

ड्रायव्हिंगच्या व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसवला. त्यातून बऱ्यापैकी पैसे जमवून बचत केली आणि स्वत:ची गाडी घेतली. पण ड्रायव्हिंगच्या व्यवसायात खूपच धकधक होती आणि त्यातून उत्पन्नही मर्यादित मिळत होते. त्यामुळे शरदराव यांनी एका मित्राच्या ओळखीने एका डेकोरेटर्सकडे रोजंदारीवर काम सुरू केले. जेव्हा जेव्हा ड्रायव्हिंगचे काम नसायचे. तेव्हा शरदराव डेकोरेटर्सकडे काम करायचे. इथे त्यांना काही हंगामाच चांगला पैसा मिळू लागल्याने त्यांनी याच कामात पूर्ण लक्ष द्यायचे ठरवले. त्यानुसार डेकोरेटर्सच्या व्यवसायात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. सर्व प्रकारची कामे शिकून घेतली. रोजंदारीतून मिळणाऱ्या पैशांची बचत सुरू केली. दरम्यान, ते ज्या मालकाकडे काम करत होते. त्यांचे अचानक निधन झाले आणि शरदरावांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्यादिवसापासून त्यांचा वेगळ्या अर्थाने खरा प्रवास सुरू झाला.

जय गणेश डेकोरेटर्सची स्थापना

शरदराव ज्यांच्याकडे काम करत होते. त्या मालकांचे ग्राहक शरदरावांनाही चांगलेच ओळखत होते. तसेच हा व्यवसाय एका माणसाने चालवण्याचा व्यवसाय नाही. यामध्ये अनेक लहान-मोठे व्यावसायिक एकत्र येऊन कार्यक्रम करतात. यात कोणी  फुले पुरवतो, कुणी विद्युत रोषणाई करतो तर कुणी खाद्यपदार्थांची व्यवस्था करतो. हा व्यवसाय सर्वांची मोट बांधून केला जातो. पण या लहान-मोठ्या व्यावसायिकांना एका धाग्यात ओवण्यासाठी एक मॅनेजर लागत असतो. तो सर्वांना मॅनेज करत असतो. नेमकी ही जबाबदारी शरदरावांनी स्वीकारली. त्यांनी एका मित्राच्या मदतीने वीस हजार रूपयांचे भांडवल गुंतवून जय गणेश डेकोरेटर्सची स्थापना केली.

पहिला चेक टाकण्यासाठी बॅंक खाते सुरू केले

शरदरावांनी जेव्हा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्यांचे साधे बॅंकेत खातेही नव्हते. पण त्यांचा लोकांमधील संचार चांगला असल्यामुळे त्या ओळखीने अनेक कामे मिळू लागली. काही लोकांनी त्यांना चेकद्वारे मोबदला दिला. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा चेक डिपॉझिट करण्यासाठी बॅंकेत खाते काढले. मग शॉप ॲक्टचे लायसन्स काढले. हळूहळु त्यांचा व्यवसायात जम बसू लागला. शरदरावांनी लोकांच्या मागणीनुसार राजवाडा, रोषणाईची कारंजी असे सेटस्‌ उभारण्यास सुरूवात केली. त्यांच्या या कामाला लोकांनी पसंती दिली. परिणामी त्यांचे काम केवळ पुण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही त्यांना बोलावणे येऊ लागले. मोठ्या कार्यक्रमांसोबतच त्यांनी वाढदिवसासारखे छोटेखानी कार्यक्रमही घेण्यास सुरूवात केली. 

अशाप्रकारे शरदरावांनी कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते हे समजून घेऊन प्रत्येक काम स्वीकारले. आता शरदराव यांनी या कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन करण्यासाठी एका इव्हेंट कंपनीची स्थापना केली. या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून लहान मुलांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, ज्येष्ठांचे अमृतमहोत्सव असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत. आज शरदरावांची जय गणेश डेकोरेटर्स कंपनीची वार्षिक उलाढाल 50 ते 60 लाख इतकी झाली आणि त्यांनी हे यश अवघ्या 20 हजारांच्या भांडवलावर आणि स्वत:च्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीवर मिळवले आहे.

स्त्रोत: यशस्वी उद्योजक