रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या खूप जास्त आहे. कारण, रेल्वे सर्वच बाबतीत परवडेबल आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी भारतीयांची पहिली पसंती ठरते. पण, एखाद्यावेळी ट्रेन लेट किंवा कॅन्सल झाली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या तिकीटाचे पूर्ण पैसे रिफंड होतील. मात्र, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
रिफंडसाठी पात्रता काय आहे?
रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तेव्हाच रिफंडचा लाभ घेऊ शकता, जेव्हा तुमची ट्रेन तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक लेट असेल. अशावेळी तुम्ही तुमचे तिकीट कॅन्सल करुन, पूर्ण रिफंड मिळवू शकता. जर तुम्ही तिकीट ऑनलाईन घेतले असल्यास, तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन ते कॅन्सल करु शकता. मात्र, तुम्ही ते तिकीट आरक्षण (Reservation) काउंटरवरुन घेतल्यास तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ते कॅन्सल करुन रिफंड घ्यावा लागणार आहे.
TDR करा ऑनलाईन फाईल
तुम्ही ज्या रेल्वेने प्रवास करणार आहात, तिचा चार्ट बनल्यानंतर ती लेट होत असल्यास तुम्हाला TDR म्हणेजच तिकीट डिपाॅझिट रिसिप्ट फाईल करावी लागणार आहे. त्याआधी तुम्हाला IRCTC वर लाॅग इन करावे लागणार आहे. नंतर वेबसाईटवरील स्टेपनुसार, चार्ट फायनल झाला नसल्याची खात्री करुन तुमचे तिकीट रद्द करावे लागणार आहे.
या परिस्थितीत मिळेल आपोआप रिफंड
तसेच, भारतीय रेल्वेने एखादी रेल्वे कॅन्सल केल्यास प्रवाशांना आपोआप पूर्ण रिफंड मिळते. ऑनलाईन खरेदी केलेल्या ई-तिकिटांसाठी रिफंडची रक्कम 3 ते 7 दिवसांच्या आत बुकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यात जमा केली जाते. तर आरक्षण काउंटरवरुन तिकीट बुक केली असल्यास, तुम्हाला काउंटरवर जाऊन तिकीट जमा करावी लागणार आहे. तेही ट्रेन सुटण्याच्या वेळेपासून तीन दिवसांच्या आत तुम्हाला तिकीट काउंटरवर जमा करणे आवश्यक असणार आहे. तेव्हाच तुम्ही रिफंडचा लाभ घेऊ शकणार आहात.
तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की वातावरण चांगले नसेल किंवा काही अडचण आली तरच रेल्वे लेट किंवा कॅन्सल होते. त्याचवेळी तुम्ही तिकीट रिफंडचा लाभ घेऊ शकणार आहात. त्यामुळे वैयक्तिक तुम्हाला तिकीट कॅन्सल करायचे असल्यास, त्यासाठी तुम्हाला वेगळी प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            