आपल्या प्रवाशांना चांगली आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रयत्नशील असते. त्यामुळेच रेल्वेला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसादही सकारात्मक असतो. अनेकवेळेला प्रवाशांना तिकीटदेखील मिळत नाही. प्रवाशांच्या या प्रतिसादामुळे रेल्वेला मोठं उत्पन्न मिळतं. मात्र दुसरीकडे काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्याचा आर्थिक फटका रेल्वेला सहन करावा लागतो. या फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेतल्या इतर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात रेल्वेकडून दंडात्मक कारवाईही करण्यात येत असते. झी बिझनेसनं याचा आढावा घेतला आहे.
Table of contents [Show]
तिकीट असणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास
तिकीट तपासणी होणार नाही, असा विचार करून अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डब्यात अतिरिक्त प्रवासी संख्या पाहायला मिळते. सहाजिकच त्याचा त्रास तिकीट काढणाऱ्यांना होत असतो. त्यामुळे वैध तिकिटांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अशा प्रवाशांवर सातत्यानं कठोर कारवाई करत असते. त्याचसंदर्भात रेल्वेनं एक अभियान राबवलं. त्यातून मोठा महसूल रेल्वेला मिळाला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अभियान
पश्चिम रेल्वेवरच्या सर्व वैध प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळावी यासाठी रेल्वेनं उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन्स, मेल, एक्स्प्रेस तसंच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीट नसलेल्या तसंच अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. तिकीट तपासणी मोहीम चालवली जात आहे. एप्रिल ते मे 2023 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोहीम राबवण्यात आली. या तिकीट तपासणी पथकानं विविध ठिकाणच्या तिकीट तपासणी मोहिमेच्या माध्यमातून मुंबई उपनगरीय विभागातून 9.75 कोटींसह 36.75 कोटी रुपये वसूल केले आहेत.
काय म्हणाले पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी?
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. या प्रसिद्धीपत्रकानुसार, मे 2023मध्ये बुक न केलेल्या साहित्यासह 2.72 लाख तिकीट नसलेले, अनियमित प्रवासी शोधून 19.99 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. याशिवाय या महिन्यात मे महिन्यात पश्चिम रेल्वेनं मुंबई उपनगरीय विभागात 79,500 केसेस शोधून 5.04 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सरप्राइज तिकीट तपासणी मोहीम
एसी लोकल गाड्यांमध्येदेखील विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी नियमित सरप्राइज तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमांचा परिणाम म्हणून, 12,800हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे. मे 2023मध्ये 42.80 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हे प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत 203.12 टक्के अधिक आहे.
तिकीट काढा अन् दंड टाळा
इतर प्रवासी पर्यायांपेक्षा रेल्वेचं तिकीट कमी दरात उपलब्ध असतं. मात्र काही प्रवृत्ती त्यातही सरकारचं नुकसान करत असतात. रेल्वेकडून अशा फुकट्या प्रवाशांवरची कारवाई आता अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे माफक दरातलं तिकीट काढायचं की दंड भरायचा हे अशा प्रवाशांनी ठरवावं, असं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होतंय.