भारतीय रेल्वेने विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून पुढील काही वर्षात रेल्वेचे देशभर आणखी विस्तृत जाळे उभे होणार आहे. प्रवासी आणि मालवाहू रेल्वे मार्गांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे खात्याने तब्बल 452 प्रकल्प हाती घेतले आहेत. या सर्व प्रकल्पातून रेल्वे मार्गाची लांबी तब्बल 49 हजार किलोमीटर एवढी वाढणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 7.33 ट्रिलियन एवढा आहे. भारताचे विकासाने इंजिन पुढे नेण्यासाठी दळणवळण मार्गांचा विकास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत.
11 हजार किमीचे प्रकल्प सुरू
मार्च 2022 पासून 11 हजार 518 किमीचे रेल्वे मार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी लागणारा 2.35 ट्रिलियन रुपये निधीही मंजूर झाला आहे. रेल्वे मंत्री अश्वनी वैश्नव यांनी लोकसभेमध्ये याबाबत माहिती दिली. रेल्वेच्या क्षमता विकासावर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जुने रेल्वे गेज म्हणजेच रुळ बदलून नवीन गेज टाकण्याचे काम सुरू आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्ग, नवे रेल्वे मार्ग, रहदारीचे रेल्वे मार्ग, नव्या मार्गांसाठी जमीन अधिग्रहण, वन विभागाच्या परवानण्या मिळवण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वेचे सद्यस्थितीतील जाळे (Current railway network)
भारतामध्ये सद्यस्थितीत सुमारे 67 हजार किमीचे रेल्वेचे जाळे पसरले आहे. यापैकी 25 हजार किलोमीटरवर दुहेरी किंवा एकापेक्षा जास्त रुळ टाकलेले आहेत. एकूण रेल्वे मार्गापैकी सुमारे 52 हजार मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या सर्व मार्गांवरून प्रवासी आणि अवजड सामानाची वाहतूक होते. मागील काही वर्षात रेल्वे विभागाने अनेक आरामदायी गाड्या सुरू केल्या आहेत. एकून रेल्वे मार्ग आणि गाड्यांच्या उभारणीसाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही भारतात मोठे रेल्वेचे जाळे उभे राहू शकले नाही.
प्रकल्प उभारणीतील महत्त्वाचे अडथळे कोणते? (Major obstacles in project development)
तत्काळ जमीन अधिग्रहण, वन विभागाची परवानगी, राज्य सरकार आणि केंद्रामध्ये संयुक्त प्रकल्पाच्या निधीची उपलब्धता, मार्गातील अडथळ्यांवर पर्यायी व्यवस्था, वैधानिक परवानण्या हे रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प भागातील भू-रचना, हवामान, त्या भागातील कायदा सुव्यवस्था हे घटक सुद्धा एखादा प्रकल्प वेळेत होईल किंवा त्याच्या खर्चात किती वाढ होईल यासाठी कळीचे ठरतात. असे असूनही जलदगतीने प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.