पुणे मेट्रोचा (Pune Metro) विस्तारित टप्पा 1 ऑगस्ट रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामध्ये फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते सिव्हिल कोर्ट (civil court) आणि वनाझ ( wanaz) ते रुबी हॉल (Ruby Hall) मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर काही तासातच प्रवाशांना मेट्रो प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या निमित्ताने पुणे मेट्रोकडून तिकीट दरामध्ये सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे करांचा प्रवास कमी वेळेत आणि कमी खर्चात होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
पुणे मेट्रोच्या विस्तारित टप्प्याचे 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये फुगेवाडी मेट्रोस्टेशन ते सिव्हील कोर्ट या एकूण 6.9 किमीच्या मेट्रो मार्गावर दापोडी,बोपोडी, शिवाजी नगर आणि सिव्हिल कोर्ट या 4 स्थानकांचा समावेश आहे. तर गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल या 4.7 किमीच्या अंतरात तब्बल 7 स्थानकांचा समावेश आहे. या विस्तारीत मेट्रो मार्गामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत.
तिकीट दर
पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केल्यानंतर प्रवाशांना पुढील काही तासातच या विस्तारीत मार्गावर मेट्रो प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. प्रवाशांना वनाझ (wanaz) ते रुबी हॉल (Ruby Hall) दरम्यानच्या प्रवासासाठी 25 रुपये आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC)ते सिव्हिल कोर्ट (civil court) पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. पुणे मेट्रोचे तिकिटाचे दर कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त 35 रुपये इतका आकारण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी तिकीट दरामध्ये सवलत
पुणेकरांसाठी मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर खासगी वाहनांचा वापरांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढत आहे. पुणे मेट्रोकडूनही मेट्रोच्या प्रवाशांना प्रोत्साहित करण्यासाठी तिकीट दरांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे मेट्रोकडून शनिवार आणि रविवार या दिवशी तिकिटामध्ये 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासासाठी तिकिटांवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. याच बरोबर सर्वसामान्य प्रवाशांसाठी ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी)कार्डच्या माध्यमातून तिकिटावर 10 टक्के सूट मिळणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक विनोद अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पुणे मेट्रो सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवासी सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. तसेच गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी आणि इतर वेळी दर 15 मिनिटांनी एक ट्रेन उपलब्ध असेल. प्रत्येक स्थानकामध्ये मेट्रो 30 सेंकदाचा थांबा घेईल.