Public Sector Banks: गेल्या पाच आर्थिक वर्षांत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाना अनुत्पादित मालमत्तेतून (Non Performing Asset) तोटा झाला असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली आहे.एकूण 7.34 लाख कोटी रुपयांच्या NPA मधील कर्जांपैकी केवळ 14% कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँका वसूल करण्यात यशस्वी ठरल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. राज्यसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, 7.34 लाख कोटी अनुत्पादित मालमत्तेपैकी केवळ 1.03 लाख कोटी रुपये वसूल झाले आहेत.
अर्थमंत्र्यांनी संसदेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी संबंधित माहिती देताना हे देखील स्पष्ट केले की शक्य तितकी वसुली केल्यानंतर गेल्या पाच वर्षांत एकूण 6.31 लाख कोटी रुपयांचे कर्ज बँकांना माफ करावे लागले आहे.
कर्जाचे निर्लेखन
दुसर्या एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी माहिती देताना म्हटले आहे की एनपीएमध्ये सलग चार वर्षांपासून ज्या मालमत्तेतून कर्जाची परतफेड होऊ शकली नाही अशा NPA ला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि बँकांच्या बोर्डांनी मंजूर केलेल्या धोरणानुसार, नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) राईट ऑफ (Loan write off) केले जात आहेत. म्हणजेच बँकांकडून दिली गेलेली कर्जे परत मिळण्याची आशा आता संपली आहे असे जेव्हा बँकांना वाटते तेव्हा कर्जाचे तपशील बँका काढून टाकत असते. एका अर्थाने हे कर्ज बुडीत निघाले आहे असेही म्हणता येईल.
NPA म्हणजे काय?
NPA अर्थात नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच अडकलेले कर्ज होय.समजा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आणि काही कालावधीनंतर तुम्ही बँकेचे हफ्ते भरू शकत नाही अशी परिस्थिती उद्भवते. तुमच्याकडे बँकेचे कर्ज परत करण्यासाठी जेव्हा काहीच मार्ग उरत नाही अशावेळी बँकेला तोटा होत असतो.
सुरुवातीला तुमच्याकडून कर्जाची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी बँकेकडून प्रयत्न केला जातो परंतु नंतर ती NPA म्हणून घोषित केली जाते.
कर्जदाराने ठराविक कालावधीसाठी, साधारणपणे 90 दिवसांसाठी व्याज किंवा मुद्दल परतफेड करणे थांबवले असेल तर नियमानुसार त्याला NPA च्या वर्गवारीत टाकले जाते.
नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता ही बँका आणि वित्तीय संस्थांसाठी एक महत्त्वपूर्ण चिंतेची बाब आहे कारण यामुळे कर्जदात्या बँकेचे मोठे नुकसान होऊ शकते. बँका सहसा त्यांच्या NPA चे विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण करतात. कर्जाच्या विरोधात ठेवलेल्या सुरक्षिततेचा प्रकार आणि इतर घटकांवर हे वर्गीकरण केले जाते. NPA चे व्यवस्थापन हे बँका आणि वित्तीय संस्थांच्या जोखीम व्यवस्थापन पद्धतींचा एक महत्वाचा मुद्दा आहे. याची योग्य दखल न घेतल्यास बँका तोट्यात येऊ शकतात.