सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे येऊ घातलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget) सरकारकडून भांडवली गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. सध्या सरकारी बँकांचे भांडवल सुस्थितीत असून या बँकांनी रु. 1 लाख कोटींहून अधिक नफा कमावला आहे. या क्षेत्रातील जाणकारांनी ही बातमी माध्यमांना दिली आहे.
भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (Capital Adequacy Ratio), जे बँकांमधील भांडवलाचे प्रमाण दर्शविते, ते देखील 14 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान आहे. जे निर्धारित केलेल्या दरापेक्षा खूप जास्त आहे.यासोबतच असेही सांगण्यात आले आहे की बँका त्यांच्या नॉन-कोअर मालमत्ता (Non Core Asset) विकून पुढील विकासासाठी बाजारातून निधी उभारत आहेत.
सरकारी बँकांना तीन लाख कोटींचे भांडवल अदा!
गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये (2016-17 ते 2020-21) सरकारने बँकांमध्ये 3,10,997 कोटी रुपयांचे भांडवल दिले गेले आहे. यापैकी 34,997 कोटी रुपये अर्थसंकल्पीय वाटपाद्वारे आणि 2,76,000 कोटी रुपये रोख्यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात सरकारने बँकांना 20,000 कोटी रुपयांचे भांडवली सहाय्य दिले होते.
बँकांची आर्थिक स्थिती मजबूत!
या आर्थिक वर्षात व्याजदरात वाढ झाल्यानंतर बँकांच्या नफ्यात चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसते आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत देशातील 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एकूण 15,306 कोटी रुपयांचा नफा झाला होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत वाढून 25,685 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 13,265 कोटी रुपयांचा नफा नोंदवला, जो बँकेने मिळवलेला आतापर्यंतचा सर्वाधिक नफा होता.