बेकरी प्रोडक्ट्समधील महत्वाचे उत्पादन असलेला पाव महागला आहे. मागील काही महिन्यात पावासाठी आवश्यक वस्तूंच्या किंंमतीत वाढ झाल्याने पाव महागला आहे. पावाची किंमत 50 पैसे ते 1 रुपया इतकी वाढवण्यात आली आहे. यामुळे एक पाव 5 रुपयापर्यंत महागला आहे. सर्वच ठिकाणी पावाची किंमत एकसारखी नसली तरी मुंबईत पाव 3 ते 5 रुपयांदरम्यान मिळत आहे.
‘’मी मुंबईत आलो तेव्हा खिशात अजिबात पैसे नसायचे, कित्येक दिवस तर वडापाव खाऊन काढलेत आणि आज हा इथवर पोचलोय,’’ ही अशी वाक्ये आपण अनेकांच्या तोंडून नेहमी ऐकत असतो. आणि खरंच आहे ते! अगदी कमी पैशात दिवस ढकलायचे म्हणजे वडापाव हा महत्वाचा पर्याय समोर उभा राहतो. मात्र, आता या वडापावच्या किमती वाढणार आहेत. याच महत्वाच कारण म्हणजे ऑक्टोबरमध्ये पाव महागला आहे. ज्यामुळे वडापाव विक्रेते देखील भाववाढ करण्याच्या तयारीत आहेत. मुंबईकरांना वडापावसाठी आता जादा पैसे मोजावे लागतील.
पावाच्या किमती का वाढल्या यावर बेकरी मालकांनी कारणे सांगितली आहेत. पावासाठी लागणारा मैदा महागला आहे. आधी 50 किलो मैदा खरेदी करताना प्रती किलो सरासरी 24 रुपयांचा भाव होता. तोच दर आता वाढून प्रती किलो सरासरी 32 रुपये इतका वाढला आहे. पाव उत्पादकांना जादा दराने मैदा खरेदी करावा लागत आहे.
गॅस सिलिंडर महागला
मैदा हा पाव तयार करण्याच्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक. त्यातल्या या वाढीबरोबरच गॅस हा एक मोठा खर्च असतो. व्यावसायिक गॅससाठी तर घरात आपण वापरतो त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. हजार रुपयात मिळणारा हा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1600-1700 रुपयापर्यंत पोहोचला आहे.
मजुरी परवडत नाही
मजुरीचा खर्चही आता पूर्वीच्या तुलनेत 100 रूपयानी वाढला आहे. लॉकडाउनमध्ये अनेक कामगार बेकार झाले होते. लॉकडाऊनपूर्वी कामगाराना 300 रुपये दिले जात होते. आता 400 रुपये इतका हा खर्च होतो. याचबरोबर वाहतुकीचाही खर्च वाढला आहे. या सगळ्यामुळे नाईलाजाने किमती वाढवाव्या लागत असल्याचे बेकरी मालक सांगत आहेत. या सगळ्या कारणांमुळे पावाच्या किमती वाढत आहेत. काही जण यावर उपाय म्हणून व आपला ग्राहक तुटू नये म्हणून पावाचा आकार कमी करण्याचा पर्याय देखील स्वीकारत आहेत. मात्र ज्या ठिकाणी अनेक बेकरी आहेत तिथे स्पर्धेमुळे पावाच्या किंमतीत फारशी वाढ झालेली नाही. यांचा फायदा हा ग्राहकांना मिळेल.
या सगळ्याचा परिणाम वडापावच्या किंमतीवर होणार
वडापावच्या किमतीवर पावाच्या वाढलेल्या किमतीचा लगेच परिणाम होतो.पावाच्या किमती वाढण्यासाठी बेकरी मालक सांगत असलेली गॅस, किराणा, मजूर अशी कारणे बहुतांश प्रमाणात वडापाव तयार करून विकणाऱ्यानाही लागू होतात. सर्वसामान्यांना वडापावसाठी जादा पैसे मोजावे लागतील.