• 02 Oct, 2022 09:58

महागाईने घास हिरावला, दोन महिन्यात तांदूळ प्रचंड महागला, हे आहे यामागचे कारण

महागाईने घास हिरावला, दोन महिन्यात तांदूळ प्रचंड महागला, हे आहे यामागचे कारण

जून महिन्यापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी, घरगुती गॅस, खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींपाठोपाठ गहू आणि तांदळाच्या दरवाढीनं जनतेच्या तोंडचा घास हिरावला आहे. (Price of all Variety of Rice Increased by 30%) जूनपासून सर्वच प्रकारच्या तांदळाच्या किंमतीत सरासरी 30% वाढ झाली. पाश्चिमात्य देशांमधील वाढती मागणी तसेच भात लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने तांदूळ महागला. मॉन्सूनने अपेक्षित साथ दिला नाही तर ही भाववाढ ऐन सणासुदीच्या काळात जनतेला होरपळून काढेल. तांदळाची वाढती निर्यात, यंदाचे अपेक्षित उत्पादन आणि देशातला धान्य साठा याकडे सरकारला वेळीच अलर्ट होऊन निर्णय घ्यावा लागेल. 

देशातील बहुतांश राज्यात भातशेती ही मॉन्सूनवरच केली जाते. त्यामुळे दरवर्षी मॉन्सूनच्या कामगिरीवर तांदळाचे उत्पादन ठरते. खरिप हंगामात मोठ्या प्रमाणात भात लागवड होऊन पिकं घेतले जाते. मात्र यंदाच्या हंगामात भात लागवड क्षेत्र कमी झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. ताज्या आकडेवारीनुसार 29 जुलै 2022 अखेर भारतातील भात लागवड क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 13.3% कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यात सरासरी देखील गाठू न शकलेला असमाधानकारक मॉन्सून आहे. अशीच काहीशी परिस्थिती ओडिसा आणि छत्तीसगडमध्ये देखील आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तांदूळ उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.

गेल्या वर्षीच्या हंगामात 130 दशलक्ष टन तांदळाचे भारतात उत्पादन झाले होते. 21 दशलक्ष टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता. पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांना भारतातून तांदूळ निर्यात केला जातो. शेजारच्या बांग्लादेशमध्ये देखील तांदळाची निर्यात केली जाते. परदेशातून तांदळाची मागणी वाढल्याने सर्वच प्रकारच्या तांदळाच्या किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी देशात गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. गहू आणि आटाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाईचा पारा चढला होता.  

सोना मसुरी या जातीच्या तांदळाच्या किंमतीत जवळपास 20% वाढ झाली आहे. याचे कारण मसुरी तांदळाला बांग्लादेशमधून मोठी मागणी आहे. बांग्लादेशने मागील महिनाभरापासून मसुरी तांदळाची भारतातून आयात सुरु केली असल्याचे राईस एक्सपोर्टर्स असोसिएशननचे म्हणणे आहे. बांग्लादेशमध्ये भात हेच मुख्य अन्न आहे. मात्र तेथे यंदा धानाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे तांदळाची मागणी पूर्ण करण्यासाठी बांग्लादेश सरकारने तांदळाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली. तांदळाचे आयात शुल्क 62.5% वरुन ते 25% इतके कमी केले आणि भारतातून आयातीचे प्रमाण वाढवले. ऐनवेळी भारताकडून तांदूळ निर्यातीवर निर्बंध लादले जाण्यापूर्वीच बांग्लादेशमधील व्यापाऱ्यांनी तांदूळ आयातीवर भर दिला आहे.  

परदेशातून मागणी वाढल्यामुळे सर्वच प्रकारातील तांदूळ महागला आहे. रत्ना तांदळाचा भाव प्रती किलो 26 रुपये होता तो आता थेट 33 रुपये झाला आहे. बासमती तांदळाच्या किंमतींत देखील दोन महिन्यात 30% वाढ झाली आहे. (Basmati Rice Price Hike) काही महिन्यांपूर्वी बासमतीचा भाव 62 रुपये होता तो आता सरासरी 80 रुपये झाला आहे. तुकडा बासमती तांदळाचा भाव 45 ते 55 रुपये या दरम्यान आहे. इराण, इराक, सौदी अरेबियामधून बासमती तांदळाला प्रचंड मागणी आहे.

यंदा उत्पादन घटणार  (Rice Production will fall)

मॉन्सूनचा लहरीपणामुळे आणि पूर, अतिवृष्टीमुळे पूर्वेकडील बहुतांश राज्यात भात लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदा खरिप हंगामात भारतात एकूण 112 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. पूर्वेकडील सहा राज्यांमध्ये भात लागवड क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 3.7 दशलक्ष हेक्टर्सने घटले आहे. एकरी 2.6 टन भाताचे उत्पादन घेतले जाते मात्र लागवड क्षेत्र कमी झाल्याने यंदा उत्पादनात किमान 10 दशलक्ष टन तांदळाची घट होण्याची शक्यता आहे.  

मोदी सरकार 80 कोटी गरिब कुटुंबांना देतंय मोफत रेशन

  • कोरोना संकटात गरिब कुटुबांना मोफत रेशन देण्याची योजना केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये जाहीर केली होती. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेत (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana - PMGKAY) गरिब कुटंबातील प्रत्येक गरिब व्यक्तीला दरमहा 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू मोफत दिले जाते.
  • त्याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (National Food Security Act) शिधापत्रिकाधारकांना प्रती किलो 2 ते 3 रुपये सवलतीच्या दराने धान्य वाटप केले जाते. यामुळे पाच सदस्य असलेल्या एका कुटुंबाला शिधापत्रिकेवर दरमहा किमान ५० किलो धान्य मिळते.  
  • मार्च 2022 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिने म्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली होती. ज्यामुळे चालू वर्षात केंद्र सरकारचा खाद्य सुरक्षेसाठीचा खर्च 2.87 लाख कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
  • PMGKAY योजनेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) महत्वाची भूमिका बजावली आहे. अन्न महामंडळाकडील धान्य साठा  PMGKAY योजनेसाठी वापरण्यात आला. जून 2022 अखेर FCI कडे 942 दशलक्ष टन धान्य साठा असेल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
  • आतापर्यंत PMGKAY योजनेत केंद्र सरकारने मोफत रेशनसाठी 3.4 लाख कोटी रुपये इतका प्रचंड खर्च केला आहे असून 600 लाख टन गहू आणि तांदूळ हे धान्य मोफत वाटप करण्यात आले. किंमती वाढल्यास सप्टेंबरनंतर सरकारकडून ही योजना बंद केली जाऊ शकते. 


तांदळाची वाढती निर्यात सध्या तरी भाववाढीचे कारण असले तरी यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदळाच्या किंमती वाढल्या तर प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेतील लाभ्यार्थांना मोफत रेशन देताना सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढेल. यामुळे वित्तीय तूट देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.