Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shiv Shakti Paints: सरधोपट इंजिनिअररिंगची वाट सोडून पेंट इंडस्ट्रीमध्ये प्रतिभा भालेराव यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला!

Yashaswi Udyojak Pratibha Bhalerao-Bhamburkar

Image Source : www.yashaswiudyojak.com

Shiv Shakti Paints: प्रतिभा भालेराव-भांबुरकर या आजही ‘वर्क इज वर्कशीप’ या भावनेने काम करतात. स्वयंरोजगारातून समृद्धी मिळवण्याच्या वाटेवर स्त्रियाही कशा उत्तम मार्गक्रमण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिभा भालेराव-भांबुरकर यांचा शिवशक्ती पेंट्स उद्योग.

Shiv Shakti Paints: स्त्रियांनी पुरुषांची सत्ता असलेल्या उद्योगक्षेत्रात येऊन आपला ठसा उमटवणे हे अभावानेच दिसून येते. पण काही स्त्रिया या दुर्दम्य आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कष्ट करण्याची अफाट क्षमता, कुटुंबकबिला सांभाळून उद्योग करण्याची यशस्वी कसरत करून सर्वांचे डोळे दिपून घेतात. अत्यंत कमी शिक्षणापासून पीएचडीपर्यंत शिकलेल्या महिला, पारंपरिक खाद्यपदार्थ निर्मितीपासून ते अपारंपरिक उद्योग क्षेत्रात मुशाफिरी करत आहेत. तर आज आपण अशाच एका वेगळ्या वाटेवरचा व्यवसाय निवडणाऱ्या आणि त्यात यशस्वीरीत्या उलाढाल करणाऱ्या प्रतिभा भालेराव-भांबुरकर यांच्या यशस्वी उद्योग (Yashasvi Udyojak) प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

पूर्वीश्रमीच्या प्रतिभा भालेराव यांनी 12वी नंतर सरधोपट इंजिनिअरिंगची वाट न पकडता काही तरी वेगळे करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार त्यांनी तीन वर्षांचा पेंट टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. पण इथेही त्यांना सहज प्रवेश मिळाला नाही. कारण या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या त्या त्यावेळी एकमेव महिला होत्या. कॉलेजनेही विचारणा केली. या कोर्ससाठी फक्त मुलेच येतात. तुम्ही एकट्या मुलगी आहात. तुम्हाला बोअर होईल. त्यासाठी सोबत म्हणून अजून एखादी मैत्रिण शोधा. हे सगळे पाहून एखाद्या मुलीने हा कोर्स करण्याचा नाद सोडला असता. पण प्रतिभाने जिद्दीने आपल्या एका मैत्रिणीला या कोर्ससाठी तयार केले आणि मेहनतीने तो कोर्स पूर्ण देखील केला.

वेगळ्या वाटेवरचा अनोखा व्यवसाय

एका वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्यापासून प्रतिभा यांचा खडतर प्रवास सुरू झाला होता. कारण कोर्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी जेवढी धडपड करावी लागली. तेवढीच धडपड कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीसाठी करावी लागली. कारण एकच या क्षेत्रात मुली नाही. पण इथेही प्रतिभा यांनी निराश न होता, एखा छोट्या कंपनीपासून सुरूवात केली. तिथे तिने संरक्षण क्षेत्र, वाहन उद्योग, प्लॅस्टिक उद्योग, डेकोरेटिव्ह उद्योग यांच्यासाठी पेंट तयार केले. नोकर करत एमबीए सुद्धा पूर्ण केले. त्यानंतर या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा या क्षेत्रात स्त्री सल्लागारांना ठेवण्याचे धाडस कोणी करायला तयार होत नव्हते. त्यामुळे प्रतिभा यांनी या क्षेत्रातील हे चॅलेंजदेखील स्वीकारून याच क्षेत्रात स्वयंरोजगार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

स्वयंरोजगाराची संधी 

दरम्यानच्या काळात एका उद्योजकाने आपल्या उद्योगात स्वत:च्या मुलाला यायचे नाही, याबाबत खंत व्यक्त करत, मुलासाठी राखीव ठेवलेली जागा पडून असल्याचे म्हटले होते. याच संधीचा प्रतिभा यांनी फायदा घेत त्या उद्योजकाचा शोध घेत त्यांना आपल्या मनातील व्यवसाय सुरू करण्याबद्दल सांगितले. तेव्हा त्या उद्योजकाने खूप आनंदाने प्रतिभा यांना ती जागा भाड्याने वापरण्यास दिली. त्या भाड्याच्या जागेवर त्यांनी शिवशक्ती पेंट्स (Shiv Shakti Paints)ची स्थापना केली. सुरूवातीला त्यांनी फक्त पांढरा रंग आणि प्रायमर बनवण्यावर भर देऊन तो छोट्या दुकानदारांना विकण्यास सुरूवात केली. पण या व्यवसायात टिकायचे असेल तर इंडस्ट्रिअल पेंट्स क्षेत्रात जाण्यावाचून पर्याय नाही, हे प्रतिभा यांना नक्की माहित होते. त्यानुसार त्यांनी ठरवून इंडस्ट्रिअल पेंट्स क्षेत्रात प्रवेश केला.

स्वत:चा खडतर प्रवास इतरांसाठी दिशादर्शक

दरम्यानच्या काळात प्रतिभा यांनी त्या उद्योजकाकडून ती भाड्याची जागा विकत घेतली. त्यानंतर कंपनीच्या नावे आयएसओ 9001 प्रमाणपत्र मिळवले. या वाढत्या व्यवसायाची गरज ओळखून प्रतिभा यांचे पती विजय भांबुरकर यांनी स्वत:चा व्यवसाय बंद करून पत्नीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. आज शिवशक्ती पेंट्सचे लहान-मोठा असे मिळून 500 हून अधिक समाधानी ग्राहक आहेत. प्रतिभा यांना जसे या क्षेत्रात येण्यासाठी झगडावे लागले तसे इतर मुलींना लागू नये यासाठी प्रतिभा यांनी पेंट टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रिअल व्हिजीट स्वखर्चाने आयोजित केल्या. तसेच या विद्यार्थ्यांना दिल्लीपर्यंतच्या कॉन्फरन्सेसमध्ये घेऊन जाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले.

वर्क इज वर्कशीप 

प्रतिभा भालेराव-भांबुरकर या आजही ‘वर्क इज वर्कशीप’ या भावनेने काम करतात. त्यांना आजही पती विजय यांची मोलाची साथ मिळत आहे. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असे त्या मानतात. पुण्याच्या पेंट टेक्नॉलॉजी कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या त्या पहिल्या महिला उद्योजिका आहेत. स्वयंरोजगारातून समृद्धी मिळवण्याच्या वाटेवर स्त्रियाही उत्तम मार्गक्रमण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिभा भांबुरकर यांचा शिवशक्ती पेंट्स उद्योग. 

स्त्रोत: यशस्वी उद्योजक