सूक्ष्म आणि लघु व्यावसायिकांना अर्थ सहाय्य करणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत आर्थिक वर्ष 2020 ते 2022 या तीन वर्षात 16 कोटी 67 लाख कर्ज मंजूर करण्यात आली आहेत. यातून तब्बल 9.98 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षात मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 68% कर्जदार महिला आहेत. (Over 16 Crore Loan Sanction under PM Mudra Yojana)
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत मुद्रा योजनेची माहिती दिली. सितारामन म्हणाल्या की, मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्या छोट्या उद्योजकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आर्थिक 2020 ते 2022 या तीन वर्षात देशात एकूण 16 कोटी 67 लाख मुद्रा कर्जांचे प्रस्ताव बँकांनी मंजूर केले. यातून उद्योजकांना 11.08 लाख कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. त्यापैकी 44% रक्कम ही महिला कर्जदारांना वितरित करण्यात आली असल्याची माहिती सितारामन यांनी संसदेत दिली. महिलांना 4.42 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले.
कारखाना उत्पादन, व्यापार, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसायातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये मुद्रा योजनेचा शुभारंभ केला होता. तेव्हापासून ही योजना सुरु आहे. आतापर्यंत या योजनेतून 37 कोटी 76 लाख कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आकडेवारीचा विचार केला तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये 6 कोटी 22 लाख मुद्रा कर्ज मंजूर करण्यात आली. त्यातील 3 कोटी 91 लाख कर्ज महिलांना मंजूर करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 5 कोटी ७ लाख कर्ज मंजूर करण्यात आली होती. त्यात 3 लाख 33 हजार कर्ज प्रस्ताव महिला अर्जदारांचे होते. चालू 2022 या वर्षात 5 कोटी 37 लाख कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यात 3 कोटी 84 लाख प्रस्ताव महिला कर्जदारांचे होते.
महिलांना ‘मुद्रा’मध्ये प्राधान्य (Priority to Women Borrower in PM Mudra Scheme)
मुद्रा योजनेत महिला व्यावसायिक आणि लघु उद्योजकांना बँकांकडून प्राधान्याने कर्ज मंजूर दिले जात असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. मुद्रा योजना सुरु झाल्यापासून नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण 37 कोटी 76 लाख कर्ज मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 25 कोटी 84 लाख कर्ज महिला अर्जदारांना मंजूर करण्यात आली आहे. मागील तीन वर्षात या योजनेतून मंजूर केलेल्या एकूण कर्जापैकी 44% रक्कम अर्थात 4.42 लाख कोटी महिला व्यावसायिकांना वितरित करण्यात आले आहेत.
बुडीत कर्जांचे प्रमाण घटले (NPA Down)
मुद्रा योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात बुडीत कर्जांचे प्रमाण प्रचंड होते. व्यावसायिकांकडून वेळेवर कर्जफेड न होणे, कर्ज वसुलीत अडचणी अशा समस्यांमध्ये मुद्रा योजना अडकली होती. मात्र टप्प्याटप्यात ही योजना अधिक पारदर्शक झाली आणि यातील कर्ज मंजुरी काटेकोर नियमांच्या आधारे करण्यात आली. ज्यामुळे बुडीत कर्जांचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे दिसून आले आहे. 31 मार्च 2022 अखेर मुद्रा योजनेतील बुडीत कर्जांचे प्रमाण (NPA) 3.17% इतके आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये या योजनेचा एनपीए 3.61% इतका होता. कोव्हीड-19 पूर्वी एनपीए 2.53% होता.