सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ही गुंतवणूक प्रामुख्याने सरकारी आणि खासगी अशा दोन भागात विभागली जाते. एकूणच गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये मुदत ठेव योजना (FD),पोस्टातील वेगवेगळ्या गुंतवणूक योजना (Post Office Scheme), म्युच्युअल फंड (Mutual Fund), एसआयपी (SIP), शेअर्स (Shares), विविध कंपन्यांचे बॉंड्स यासारख्या पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला देखील दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) आणि म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) हे दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कुठे गुंतवणूक केली, तर तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळेल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गुंतवणूक कार्यकाळ किती?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत (PPF) गुंतवणूक करण्याचा कार्यकाळ 15 वर्षाचा आहे. सलग 15 वर्ष गुंतवणूक करून गुंतवणूकदार यामध्ये मोठा फंड तयार करू शकतात. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकरकमी मोठा फंड यामधून मिळू शकतो.
म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक करत आहेत. यातील गुंतवणूक कालावधी किमान 1 वर्षाचा आहे. जास्तीत जास्त कितीही वर्ष यामध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीचा कार्यकाळ जितका जास्त तितका त्यातून मिळणारा परतावा जास्त, असे याचे सोपे समीकरण आहे.
व्याजदर किती मिळेल?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत सरकारकडून निश्चित व्याजदर दिला जातो. हा व्याजदर कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार सरकारला असतो. तिमाही आधारावर हे व्याजदर बदलू शकतात. सध्या या योजनेत 7.10 टक्के व्याजदर मिळत आहे. मात्र ही गुंतवणूक सुरक्षित असून हमीबद्द परतावा स्वरूपातील आहे.
एसआयपी ही बाजारातील जोखिमेच्या अंतर्गत येते. यातील व्याजदर हा निश्चित नसून तो निवडलेल्या फंडाच्या कामगिरीवर देण्यात येतो. यामध्ये किमान 12 ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. मात्र बाजारात फंडाची कामगिरी म्हणावी तशी राहिली नाही, तर व्याजदर कमी देखील होऊ शकतो.
किमान आणि कमाल गुंतवणूक जाणून घ्या
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत वार्षिक किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. एसआयपीमध्ये मासिक 500 रुपये भरून गुंतवणूक सुरू करता येते. याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
कर सवलत मिळते का?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत (PPF) वार्षिक 1.5 लाखांपर्यंतची गुंतवणूक आयकरच्या 80 सी अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे.
पॉलिसी बाजारनुसार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) अंतर्गत एसआयपी EEE श्रेणी अंतर्गत येते. याचा अर्थ, यातील उत्पन्न करमुक्त आहे. ELSS फंडातील एसआयपीमध्ये वार्षिक 1.5 लाखांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीस पात्र आहे.