पोस्ट खात्यातील गुंतवणूक ही आजही अनेकांसाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानली जाते. पोस्टातील गुंतवणुकीची हमी केंद्र सरकारची असल्याने यात बहुतांश गुंतवणूकदार विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात. मात्र पोस्टातील बचत खात्याविषयी केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. यात पैसे काढण्याबाबत आणि व्याजासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटच्या नियमांत सुधारणा करण्यात आली आहे. अर्थ खात्याच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून 3 जुलै 2023 रोजी या सुधारणांबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
यातील पहिला बदल म्हणजे आता पोस्टाच्या बचत खात्यात तीन व्यक्ती खातेदार राहू शकतात. यापूर्वी संयुक्त खात्यासाठी दोनच व्यक्ती खातेदार म्हणून असायच्या. आता या नियमात बदल करुन संयुक्त खात्यासाठी खातेदारांची संख्या 2 वरुन 3 करण्यात आली आहे.
पोस्टाच्या बचत खात्यातून पैसे काढण्याबाबत देखील एक महत्वाचा नियम बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता बचत खात्यातून 50 रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी खातेदाराला फॉर्म नं 3 सादर करावा लागेल. यापूर्वी फॉर्म नंबर 2 आणि पासबुक दाखवून बचत खात्यातून पैसे काढता येत होते. आता हा बदल करण्यात आला असून खातेदाराला फॉर्म नंबर 3 सादर करावा लागेल.
फॉर्म नंबर 3 मधून बचत खातेदाराला केवळ पैसे काढण्यासाठीच नव्हे तर कर्जासाठी देखील अर्ज करता येऊ शकतो, असे अर्थ खात्याने म्हटले आहे.
पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याजाबाबत देखील एक महत्वाचा नियम बदलण्यात आला आहे. पोस्टाच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 4% व्याज मिळणार आहे. मात्र हे व्याज वर्षअखेर असलेल्या शिल्लक रकमेवर मिळेल, असे अर्थ खात्याने म्हटले आहे. या काळात खातेदाराचा मृत्यू झाला तर ज्या महिन्यात खाते बंद होईल त्याआधीच्या महिन्यापर्यंत व्याज दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.