तुम्हालाही निवृत्तीनंतर चांगले आणि दर्जेदार आयुष्य जगायचे असेल, तर एक चांगला फंड तयार करणे गरजेचे आहे. हा फंड तयार करण्यासाठी सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिसमधील योजना (Post Office Scheme), म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धत (SIP), मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) योजनेचा समावेश करण्यात आला आहे. पोस्टातील गुंतवणूक योजना या अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा (Returns) मिळवून देणाऱ्या असतात.
पोस्टाच्या ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये’ (SCSS) गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येतो. या योजनेत गुंतवणूकदाराला किती व्याजदर मिळेल? गुंतवणुकीचा कालावधी किती? त्यासाठी पात्रता निकष काय? कर सवलतीचा लाभ घेता येईल का? तसेच मासिक उत्पन्न यातून मिळेल का, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोणाला गुंतवणूक करता येते?
भारतीय पोस्टाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 60 वर्षांवरील कोणताही व्यक्ती SCSS खाते सुरू करू शकतो. 55 वर्षांवरील आणि 60 वर्षांखालील सिव्हिलीयन कर्मचारी या योजनेत खाते सुरू करू शकतात. तसेच संरक्षण खात्यातील 50 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा निवृत्त कर्मचारी SCSS खाते काढू शकतात. वैयक्तिक किंवा जॉइंट खाते सुरू करण्याचा पर्यायही या योजनेत देण्यात आला आहे.
गुंतवणूक कालावधी आणि व्याजदर जाणून घ्या
SCSS खात्याला पाच वर्षाची कालमर्यादा आहे. म्हणजेच पाच वर्षांपर्यंत पैसे गुंतवता येतात. तसेच 3 वर्षांनी कालमर्यादा वाढवताही येऊ शकते. गुंतवणुकीतून मिळालेले व्याज दर तीन महिन्यांनी गुंतवणूकदार काढू शकतो. सध्या या योजनेत 8.2 टक्के व्याजदर मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत 30 लाखांची गुंतवणूक केली, तर तीन महिन्यांनी तुम्हाला 61,500 रुपये व्याज मिळू शकते. म्हणजेच मासिक 20,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. जर वृद्ध दाम्पत्याने मिळून प्रत्येकी 30 लाखांची गुंतवणूक केली, तर महिना 41,000 रुपये व्याज मिळू शकते.
SCSS या योजनेचे व्याजदर सरकारकडून दर तीन महिन्यांनी अपडेट केले जातात. सध्या लागू असलेला दर पुढील पाच वर्ष तेवढाच राहील याची हमी देता येत नाही. गुंतवणूक कालावधीत हा दर वाढू किंवा कमी होऊ शकतो.
कर सवलत मिळेल का?
पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याहून जास्तीच्या रकमेवर गुंतवणूकदाराला कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com