सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तरीही सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक पद्धत म्हणून आजही लोक पोस्टातील योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पोस्टाकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये सर्वाधिक परतावा दिला जातो. अशाच दोन महत्त्वाच्या योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) आणि आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme). या दोन्ही योजनांमध्ये पैसे गुंतवून सर्वाधिक परतावा मिळवता येतो. मात्र या दोन्ही योजनांमध्ये नेमका फरक काय? कुठे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
मुदत ठेव योजना Vs आवर्ती ठेव योजना
बँकेच्या मुदत ठेव योजनेप्रमाण पोस्टमध्ये देखील मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) चालवली जाते. अगदी तशाच स्वरूपाची आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme) देखील आपल्याला पोस्टात पाहायला मिळते. मात्र या दोन्ही योजनांमध्ये एक छोटासा फरक आहे. पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत ग्राहकांना एकरकमी ठराविक पैसे ठराविक कालावधीसाठी गुंतवावे लागतात. ज्यावर त्यांना निश्चित स्वरूपातील व्याजदर दिले जाते.
याउलट आवर्ती ठेव योजना ही म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) पद्धतीप्रमाणे असते. या योजनेत मासिक आधारावर ठराविक रक्कम गुंतवणूकदाराला भरावी लागते. आवर्ती ठेव योजनेचा कालावधी हा वेगवेगळा असतो. मात्र असे असले, तरीही गुंतवणूकदार त्याला हवा तो कालावधी निवडू शकतो. या कालावधीवर त्याला व्याजदर दिले जाते.
गुंतवणूक कालावधी आणि व्याजदर जाणून घ्या
पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी पैसे गुंतवता येतात. मात्र हे पैसे एकरकमी गुंतवावे लागतात. आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) देखील 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी पैसे गुंतवता येतात. मात्र हे पैसे मासिक आधारावर गुंतवले जातात.
पोस्टातील मुदत ठेव योजनेत ग्राहकांना 6.60 ते 7 टक्के व्याजदर दिला जातो. हा व्याजदर गुंतवणुकीच्या कालावधीनुसार कमी किंवा जास्त केला जातो. तर आवर्ती ठेव योजनेत 6.5 टक्के व्याज दिले जाते.
किमान गुंतवणूक जाणून घ्या
पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) ग्राहकांना किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. तर आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) 100 रुपये महिना गुंतवणूक करून खाते सुरु करता येते.
कर सवलत मिळते का?
5 वर्षांसाठी केलेल्या मुदत ठेवीवर (Fixed Deposit Scheme), आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी दावा करता येतो. या मुदत ठेवीवरील व्याज हे वार्षिक 40,000 च्या पुढे जात असेल, तर त्यावर कर भरावा लागतो. तर आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme) कर सवलतीस पात्र नाही. यातील उत्पन्नावर कर भरावा लागतो.