Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pola Festival : शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर फायद्याचा की सर्जा-राजा बैलजोडी?

Pola Festival : शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर फायद्याचा की सर्जा-राजा बैलजोडी?

Image Source : www.tractorjunction.com

सध्या ट्रॅक्टरच्या किमतीचा विचार केल्यास त्या किमान 5 लाख ते 16 लाखांपर्यंत आहेत. लहान ट्रॅक्टर जरी घ्यायचा म्हटले तरी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच तुलनेत बैलांच्या किमती पाहिल्या तर त्या कमीत कमी 50 हजार रुपयांपर्यंत आणि जास्तीत जास्त 1 ते 1.2 लाख रुपयांपर्यंत आहेत. शिवाय सद्यस्थितीत अंतर्गत मशागतीच्या कामांना बैलांना मोठी मागणी आहे.

शेतकऱ्यांचा आणि त्याच्या बैल जोडीचा सण म्हणजे बैल पोळा होय. या सणाला शेतकरी आपल्या सर्जा राजा बैलजोडीची पूजा करून त्याच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र, शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे कित्येकांच्या दावणीवरील बैलजोडीची जागा आता टॅक्टरने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत, काही शेतकऱ्यांकडे फक्त ट्रॅक्टर तर काही शेतकऱ्यांकडे बैल आणि ट्रॅक्टर हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. दरम्यान, शेती व्यवसायासाठी टॅक्टर योग्य आहे की बैलजोडी याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात..

पारंपरिक शेती आणि यांत्रिकीकरण

पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होता. त्यासाठी बैलाच्या माध्यमातून शेतीची मशागत केली जायची. 10 ते 15 वर्षापूर्वीचा काळ पाहिला असता प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला एक ते दोन बैल जोड्या निश्चित होत्या. त्यावेळी शेतकरी पारंपरिक पिकांची लागवड करत असे, गहू, ज्वारी, सोयाबीन, कपाशी, तूर, भूईमूग यासारखी लहान लहान पिके घेत असताना बैलाच्या सहाय्याने मशागत करणे सोपे होते. मात्र, अलीकडच्या काळात जसे जसे शेतीचे यांत्रिकीकरण होऊ लागले, पाण्याची उपलब्धता वाढली, बागायती शेतीचे प्रमाण वाढले तसे शेतीच्या कामासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला. यांत्रिकी करणामुळे शेती कामाला लागणाऱ्या वेळत बचत होऊ लागली. तसेच शेतीची ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे खरेदी करण्यासाठी बँकाकडून कर्जपुरवठा होऊ लागला, सरकारकडून अनुदान प्राप्त झाले त्यामुळे बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. दरम्यान, पुढील काही मुद्द्यांच्या माध्यमातून सद्यस्थितीत शेती कामासाठी कोणता पर्याय फायद्याचा ठरू शकतो याबाबतचा आढावा आपण जाणून घेऊयात

बैलांच्या सहाय्याने शेती

पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी आजही बैलाच्या सहाय्यानेच शेत जमिनीची मेहनत करतो. अद्यापही काही शेतकऱ्यांकडे बैलाच्या जोड्या आहेत. तसेच अलिककडच्या काळात बैलजोडी खरेदी करण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामागचे कारण म्हणजे शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला पंरतू लहान लहान पिकांची अंतर्गत मशागत करण्यासाठी बैलाचाच वापर करावा लागत आहे. उसाची बांधणी असेल, लहान लहान तुकडे असलेली जमीन या ठिकाणी बैलानेच मशागत करणे सोपे होते. शिवाय बैल बारदाणा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला रासायनिक खतांची गरज पडत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला पशूधन आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेताला सेंद्रीय खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.  तसेच अलीकडच्या काळात इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ट्रॅक्टरची शेती परवडत नाही. ट्रॅक्टरच्या किमतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या तुलनेत बैलजोडीच्या माध्यमातून शेती करणे फायद्याचे ठरत आहे. तसेच बैलगाडा शर्यतीसाठी देखील सर्जा राजा जोडीला मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलासाठी चांगली किंमत मिळत आहे.

टॅक्टर वापराचे फायदे

ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेती कामाचा वेग वाढला आहे. शिवाय ट्रॅक्टरचा वापर हा वेगवेगळ्या कामासाठी करता येतो. फवारणी, नांगरणी, कुळवणी, पेरणी, उस वाहतूक या कामासाठी बैलांच्या तुलनेत ट्रॅक्टर बहुपयोगी ठरत आहे. तसेच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर शेती कामासाठी भाड्यानेही देता येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत होत आहे. यासह बहुतांश बागायतदार शेतकरी हे ट्रॅक्टरला शेतीपूरक व्यवसायाचे साधन म्हणून वापर करत आहेत. साखर कारखानदारीसाठी देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करता येतो.

ट्रॅक्टरच्या किंमतीच्या तुलनेत बैलजोडी स्वस्त

सध्या ट्रॅक्टरच्या किमतीचा विचार केल्यास त्या किमान 5 लाख ते 16 लाखांपर्यंत आहेत. लहान ट्रॅक्टर जरी घ्यायचा म्हटले तरी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच तुलनेत बैलांच्या किमती पाहिल्या तर त्या जास्तीत जास्त 1 ते 1.2 लाख रुपयांपर्यंत आहेत. तसेच कमीत कमी 50 हजार रुपयांपर्यंत बैलजोडी उपलब्ध होते. शिवाय सद्यस्थितीत अंतर्गत मशागतीच्या कामांना बैलांना मोठी मागणी आहे. याचबरोबर सध्या इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरची शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ट्रॅक्टरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेतही घट झाली आहे. परिणामी बँकाचे कर्ज थकणे, ट्रॅक्टर बसून राहणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तुलनेत शेती कामासाठी बैलांची मागणी वाढली असून बाजारातही चांगली किंमत मिळत आहे. याशिवाय बैल जोडीला जास्तीचा मेंटेनन्स खर्च करावा लागत नाही.

दोन्हीची सांगड घालून शेती करणे फायद्याचे

वरील गोष्टींचा विचार केला असता, सद्यस्थितीत इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टर परवडत नसला तरी बैलाच्या तुलनेत  त्याचे फायदे अधिक आहेत. तसेच बाजारात ट्रॅक्टरची स्पर्धा अधिक वाढल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही मशागतीसाठी ट्रॅक्टर सहज उपलब्ध होत आहे. मात्र, मशागतीची पद्धत आणि इंधनाचा वाढता खर्च या दृ्ष्टीने विचार केल्यास शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि बैल या दोन्हीची सांगड घालणे फायद्याचे ठरणार आहे.