Pola Festival Market : पोळा हा शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या सणाने पारंपरिक लोकसंस्कृतीचा वारसा जपलेला आहे. वर्षभर प्रचंड कष्ट करणाऱ्या बैलाप्रती पोळा या सणाच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरीही सर्जा राजाचा उत्सव साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारे खर्चासाठी हात आखडता घेतला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पोळा या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेचा आढावा घेण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ..
Table of contents [Show]
साहित्यामध्ये भाववाढ
पोळा या सणाला पारंपारिक लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. हा सण शेतकरी अत्यंत आनंदाने साजरा करतात. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे पोळा सणावर मंदीचे सावट दिसून आले. त्यामुळे विक्रेते निराश होते. यावर्षी पोळा सणा निमित्त बैलांना सजवण्याच्या झूल, घंटा, बाशिंग, मथाळी, पैंजण, इत्यादी वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. मात्र, यंदा सजावटीच्या साहित्यामध्ये 10 ते 15 टक्के भाववाढ दिसून आली आहे. तरीदेखील यावर्षी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे विक्रेते आनंदी दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तेच ते सजावटीचे साहित्य वापरणारे शेतकरी नवनवीन वस्तूंची मागणी करीत आहे.
सजावटीच्या साहित्याचे दर काय?
सजावटीच्या साहित्यामध्ये मढाढी 50 रुपये, नाथ 40 रुपये, दोर 150 रुपये, केसाळ पैजण 60 रुपये, रंगाची माळ 100 ते 120 रुपये, घंटी 150 ते 450 रुपये, कवड्यांची माळ 100 रुपये जोडी, रंगविण्याचे साहित्य 40 ते 80 रुपये, मोस्के 80 ते 130 रुपये, झुल 500 ते 3000 रुपये, बाशिंग 100 ते 500 रुपये अशा किंमतीत विकले जात आहे. नागपूर शहरातील इतवारी, गांधीबाग या परिसरात बैल सजावटीच्या साहित्याची अनेक दुकाने लागली आहेत.
कमी पावसाचा परिणाम विक्रीवर नाही
यावर्षी पाऊस कमी पडल्याने त्याचा परिणाम पोळा या सणावर होईल असे वाटत होते. परंतु, पाऊस कमी-अधिक झाल्याचा कुठलाही परिणाम पोळा या सणावर होतांना दिसत नाही. कारण वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांवर शतकऱ्याचे प्रचंड प्रेम असते. त्यामुळे त्याच्या बाबतीत ते कसलीही कमी करीत नाही, असे मत साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केले.
मार्केटमध्ये आर्थिक उलाढाल
गेले दोन - तीन वर्ष कोरोनामुळे मार्केट अतिशय ठप्प होते. परंतु, आता शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने नफा-नुकसान प्रत्येक वर्षालाच सुरु असते. परंतु, यंदा पोळा सणाच्या बैल सजावटीच्या साहित्याचे संपूर्ण मार्केटचे टर्न ओव्हर 10 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तर या सिझनमध्ये विक्रेते 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवतात.