केवायसी अपडेट म्हणजेच Know Your Customers साठी आरबीआय आणि वित्तीय सहाय्य देणाऱ्या बँका आता कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. बँकांमध्ये खाते सुरु करणारे ग्राहक नेमके कोण आहेत,त्यांचा रहाता पत्ता, PAN कार्डचे डीटेल्स, नॉमिनीचे डीटेल्स वेळोवेळी बँका घेत असतात. आता PNB बँक देखील याबाबत अधिक सक्रीय झाली असून पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना 31 ऑगस्ट 2023 पूर्वी KYC माहिती अपडेट करण्यास सांगितले आहे. जर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत केवायसी अपडेट करण्यास ग्राहक अयशस्वी ठरले तर त्यांच्या बँक खात्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.
काय होईल कारवाई?
पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना मेलद्वारे, मेसेजद्वारे वेळोवेळी केवायसी अपडेट करण्यास सांगितलेले आहे. परंतु ज्यांनी अजूनही केवायसी अपडेट केले नसेल त्यांना 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु जे ग्राहक देय तारखेपर्यंत खाते अपडेट करण्यास अयशस्वी ठरतील अशांना त्यांच्या खात्यातून व्यवहार करता येणार नाहीये. केवायसी अपडेट न केलेली खाती स्थगित केली जातील असे बँकेने जाहीर केले आहे.
RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केवायसी अपडेट बाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. बँकेने याबाबतची कल्पना ग्राहकांना देण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर दोन नोटिसा आणि एसएमएस सूचना पाठवल्या आहेत. यात 31 ऑगस्ट 2023 पर्यंत केवायसी अपडेट करण्यास ग्राहकांना सूचित करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे
पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांकडून ओळखीचा पुरावा (Identity Proof), पत्ता पुरावा (Residential Proof), अलीकडील फोटो (Latest Photo), पॅन कार्ड (PAN Card), उत्पन्नाचा पुरावा (Income Proof), अपडेटेड मोबाईल नंबर (Updated Mobile Number) असे डीटेल्स मागत आहेत. तुम्ही नजीकच्या बँक शाखेत जाऊन या कागदपत्रांची साक्षांकित प्रत जमा करू शकता.
याशिवाय ग्राहकांना त्यांचे केवायसी कागदपत्रे नोंदणीकृत ईमेलवर किंवा पोस्टाने देखील पाठवता येणार आहेत. हे ग्राहक बँकेचे मोबाईल ॲप वापरतात त्यांना त्यांच्या ॲपमधूनच माहिती सादर करता येणार आहे.