बहुतेक लोकांना वेगवेगळी ठिकाणं पाहण्याची, लांब कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन वेळ घालवण्याची आवड असते. पण कोरोना महामारीमुळे मागील 2 वर्षात अनेक मुसाफिर घरात कैद झाले होते. आता सर्व सुरळीत झाल्यानंतर बहुतेकांना फिरण्याचे वेध लागले आहेत. पण महागाईमुळे फिरण्याच्या बाबतीत हात आखडता घ्यावा लागत आहे. पण जर आपल्याला कोणत्या ठिकाणी आणि किती दिवसांकरता जायचे आहे हे ठरवून योग्य नियोजन आणि आपले बजेट ठरवले तर कमी खर्चात ही टूर करता येऊ शकते. या टूरचे नियोजन करताना गुगलची तुम्हाला चांगली मदत होऊ शकते. ट्रॅव्हल एजन्सी किंवा काही टूर पॅकेजेसचा विचार केला तर तुमची टूर थोडी खर्चिक होऊ शकते. कारण त्या टूर पॅकेजवर तुम्हाला जीएसटी (GST) सुद्धा द्यावा लागेल. तसेच त्यांनी केलेली व्यवस्था तुम्हाला नाही आवडली, तरी पैसे भरले आहेत म्हणून नाक मुरडत ती टूर पूर्ण करावीच लागते. म्हणून तुम्हीच तुमची टूर तुमच्या खर्चाच्या हिशोबाने प्लॅन करा.
कमी खर्चात टूर अशी प्लॅन करा
तिकिटाचे बुकिंग
कुठे जायचे हे जर आधीच ठरले असेल तर जायचे आणि यायचे रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट आधीच बुक करून ठेवायचे. हे बुकिंग आपण स्वतः केले तर तिकीट एजंटला द्यावे लागणारे अतिरिक्त पैसे वाचतात. रेल्वे किंवा विमान कंपन्यांच्या संकेतस्थळावरून सहज बुकिंग करता येते. विमानाच्या तिकीट बुकिंगवर काही बँकांकडून ठराविक दिवसात विशेष सूट दिली जाते. याचा वापर करूनही आपण पैसे वाचवू शकतो.
स्वस्तात मस्त राहण्याची व्यवस्था
टूरमध्ये कुठेकुठे विश्रांतीसाठी थांबणार आहात, हे नक्की असेल तर गुगलच्या मदतीने रूम बुकिंग करणं सोपं होऊ शकतं. हॉटेलच्या बुकिंगसाठी अनेक मोबाईल अॅप्स आहेत. मेक माय ट्रिप (makemytrip), गोइबिबो (goibibo), ओयो (oyo) द्वारे हॉटेल बुक करू शकता. तसेच त्या ठिकाणी जाऊनही बुकिंग करता येऊ शकते. या अॅप्सवर बजेटनुसार राहण्याच्या सोयी उपलब्ध असतात.
साईटसीन कसे करावे
हॉटेल किंवा राहण्याची व्यवस्था अशाच ठिकाणी बघायचे जिथून साईटसीन करण्याचा प्रवास सोपा होईल. हॉटेलच्या जवळ, बस स्टॅन्ड किंवा लोकल वाहतुकीची सोय उपलब्ध असलेली ठिकाणे निवडावीत. जेणेकरून कमी खर्चात साईटसीनही करता येते आणि प्रवासाचा वेळही वाचू शकतो.
महाराष्ट्रात फिरायचा विचार करत असाल तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC ) बऱ्याच पर्यटनस्थळी हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. इतर हॉटेलच्या तुलनेत ती स्वस्त आहेत. एमटीडीसीच्या संकेतस्थळावरून तुम्हाला बुकिंग व इतर सोयीसुविधांची माहिती मिळू शकते. अशा पद्धतीने तुम्ही तुमची बजेट टूर प्लॅन करू शकता.